महसूल कर्मचार्‍यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

0

सिंधुदुर्गनगरी : महसूल कर्मचार्‍यांनी बुधवारी एक दिवसाची सामूहिक रजा टाकत आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केली. बुधवारी सकाळी या सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरत सरकार विरोधी घोषणा दिल्या. या आंदोलनामुळे महसूल विभागात शुकशुकाट पसरला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील 600 महसूल अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. महसूल कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले असून, बुधवारी एक दिवसाच्या सामूहिक सुट्टीने या आंदोलनाची सुरुवात केली आहे. या सामूहिक सुट्टी आंदोलनानंतर  31 ऑगस्ट  रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप (यादिवशी कर्मचारी रक्तदान करून शासनाचा निषेध करणार आहेत) आणि 5 सप्टेंबरपासून पुढे बेमुदत संप  करण्यात येणार आहे. 28 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसाची सामुदायिक रजा टाकून धरणे आंदोलन करण्याबाबत सर्व कर्मचार्‍यांना हाक देण्यात आली होती. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी एक दिवसाची रजा टाकून धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनामध्ये साधारणपणे 150 ते 170 कर्मचारी सहभागी होते. या आंदोलनात शासनाच्या निषेधार्थ घोषणा करण्यात आल्या. 31 ऑगस्ट 2019 रोजी लाक्षणिक संप असून यादिवशी सकाळी 10 वा. महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर हे राष्ट्रीय काम असल्याने सर्व कर्मचार्‍यांनी स्वयंप्रेरणेने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा संघटनेकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी कर्मचारी संघटनेचे संतोष खरात, सत्यवान माळवे, अशोक पोळ, परमेश्वर फड, विलास चव्हाण, उमेश काळे असे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here