लाहोर : पाकिस्तानी लष्कराकडून गुरुवारी रात्री गझनवी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, गझनवी हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या लष्कराचे अभिनंदन केले आहे. हे क्षेपणास्त्र २९० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. तसेच या क्षेपणास्त्राद्वारे विविध स्फोटके वाहून नेता येऊ शकतात. काश्मीर मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून समर्थन न मिळाल्याने पाकिस्तानने यापूर्वीच बलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची धमकी दिली होती. कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच भारतीय विमान वाहतुकीसाठी पाकिस्तानातील हवाई क्षेत्राच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यावर पाकिस्तान विचार करत असल्याचे पाक सरकारने जाहीर केले होते. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याने पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. यात पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा मांडला. परंतु त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकटा पडला. त्यामुळे पाकच्या तणावात कमालीची वाढ झाली आहे. पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताने गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने या तणावात आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडीमुळे पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारत- पाक युद्ध ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचा केलेला दावा खरा ठरतो की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
