पाकिस्तानी कमांडो गुजरात समुद्रामार्गे घुसण्याच्या तयारीत

0

गांधीनगर : पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले दहशतवादी गुजरातमध्ये समुद्रामार्गे घुसणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. त्यामुळे या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातच्या कच्छ भागामध्ये पाकिस्तानचे कमांडो आणि दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. हे दहशतवादी समुद्रातील जहाजांना लक्ष्य करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर कांडला बंदरावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्याचसोबत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर हाय अलर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तटरक्षक दलाकडून समुद्रामध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. भारतीय नौदल चीफ एडमिरल करमबीर सिंह यासंदर्भात बोलताना, पाण्याखालून हल्ला करण्याचे प्रशिक्षक जैश-ए-मोहम्‍मद देत असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली असल्याचे सांगितले. बीएसएफ आणि भारतीय तटरक्षक दलासह अन्य सुरक्षा यंत्रणांनाही हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्व ठिकाणी हाय अलर्ट देण्यात आला आहे. अशी माहितीही एडमिरल करमबीर सिंह यांनी दिली. गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर कोस्ट गार्ड, पोर्ट प्राधिकरण, कस्टम, कोस्टल पोलिस, नेव्हीला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, जम्मू- काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. सतत युद्धाचा इशारा देत आहेत. काल रात्री पाकिस्तानकडून अण्वस्त्र सज्ज गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here