खेड : तालुक्यातील शेरवली येथील २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात बुधवार दि. २८ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास आढळून आला. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंदार मारुती मिसाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिस पाटील अशोक नारायण मिसाळ यांनी खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, मंदार याचा मृत्यू दि. २७ रोजी रात्री ८ ते दि. २८ रोजी सकाळी ९.३० या कालावधीत झाला असावा, असे नमूद केले आहे. मंदार हा गणपती सणासाठी दि.२५ रोजी शेरवली या आपल्या गावी आला होता. त्याचे चुलते रामचंद्र मिसाळ यांच्या घरी तो जेवत असे. मात्र, दि. २७ रोजी रात्री तो घरी जेवायला आला नाही म्हणून त्याचे चुलते त्याच्या घरी दि.२८ रोजी पाहण्यासाठी आले असता त्यांना मंदारचा मृतदेह घराच्या छपराला वाशाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिस पाटील यांनी दिलेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
