एस.टी.च्या कारभारावर सरपंच नाराज

0

चिपळूण : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एस.टी. व्यवस्थापनातर्फे मंगळवारी सरपंचांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सरपंचानी एस.टी.च्या कारभारावर ताशेरे ओढले. सर्वांच्या मागणीनुसार जादा बस देण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी येथील आमसभेत एस.टी.च्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्याच पद्धतीची नाराजी मंगळवारी शहरातील शिवाजीनगर बसस्थानक नजीकच्या अधिकारी निवासस्थानातील सभागृहात झालेल्या बैठकीत सरपंच व सदस्यांनी व्यक्त केली. आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या या बैठकीला २७ ग्रामपंचायतींचे सरपंच व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी एस.टी.च्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. बस वेळेवर सुटत नाहीत, अचानक बसफेऱ्या रद्द केल्या जातात आदी तक्रारी करण्यात आल्या. यावेळी पं. स. सदस्य राकेश शिंदे, बाबू साळवी यांनीही एस.टी. च्या कारभारात सुधारणा अपेक्षित असल्याचे मत मांडले. गणेशोत्सवात गणेशभक्तांच्या मागणीनुसार जादा बस उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी केली.यावर आगारप्रमुख संदीप पाटील यांनी २५० जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here