रत्नागिरी : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) अनाथ बालकांच्या शाळा प्रवेशासाठी कागदपत्रे जमा करण्याच्या नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. आता अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार असल्यामुळे या मुलांना दिलासा मिळणार आहे. ‘आरटीई’ प्रवेशाकरिता अनाथालयामधील विद्यार्थी या संवर्गाचा समावेश करण्यात यावा. याबाबतची सुविधा आरटीई पोर्टलमध्ये एनआयसीने उपलब्ध करुन द्यावी. अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरावीत. उत्पन्नाच्या दाखल्याची अट घालू नये, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या १६ जानेवारी २०१८ च्या निर्णयानुसार राज्यात ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतची सुधारित कार्यपद्धती निर्धारित केलेली आहे. या अंतर्गत खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना अनाथ बालकांना प्रवेश देताना अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, तरीही या बालकांच्या प्रवेशांकरिता इतर कागदपत्रांची मागणी करण्यात येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. याची दखल घेऊन स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सरल डेटाबेसमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी एनआयसीने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. या विद्यार्थ्यांना आई-वडील यांचे नाव माहित नसल्याने त्या ठिकाणी ‘नॉट नोन’ असे नमूद करावे लागणार आहे. आडनाव, धर्म माहिती नसल्याने त्या ठिकाणीही ‘नॉट नोन’ असा स्पष्ट उल्लेख नमूद करावा लागणार आहे. कॅटेगरी या पर्यायात अनाथ असे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अनाथ मुलांच्या शाळांमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांना दत्तक घेतल्यास दत्तक घेणाऱ्या पालकांचे नाव व आडनाव अद्ययावत करण्यासंदर्भात ‘न्यूएन्ट्री’ टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
