रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणाची २८ कोटींची थकबाकी

0

रत्नागिरी : कोकण परिमंडळाची एकूण ४७.८३ कोटींची थकबाकी आहे. यामध्ये रत्नागिरी मंडळाची २८.२१ कोटी व सिंधुदुर्ग मंडळाची १९. ६२ कोटींची थकबाकी असून, वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करा. ९० टक्के पेक्षा कमी वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा, असे आदेश सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील(भाप्रसे) यांनी सर्व परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडील चालू थकबाकी ९४४ कोटींवर पोहचली असून, एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे ही ९४४ कोटींची चालू थकबाकी आहे. यामुळे महावितरणच्या महसुलावर परिणाम होत आहे. कोकण प्रादेशिक कार्यालया अंतर्गत येणाऱ्या १२ जिल्ह्यात कार्यरत अधिकाऱ्यांच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेताना विजयकुमार काळम पाटील यांनी हे आदेश दिले आहेत. वीज बिल थकबाकीदार ग्राहकांचा पुरवठा तत्काळ तोडा. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी अनधिकृत वीज पुरवठा घेतला असल्यास अशा ग्राहकांविरुद्ध गुन्हा नोंद करा. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर पुन:जोडणी शुल्क भरल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाचा वीज पुरवठा सुरु करू नये. तसेच आगामी आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर २९ ऑगस्ट पूर्वी अत्यावश्यक कामांची एमपॅनेलमेंट टेंडर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास प्रादेशिक कार्यालयास अथवा ‘प्रकाशगड’ या मुख्यालयास संपर्क साधावा. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना विहित प्रक्रियेद्वारे तात्पुरती वीज जोडणी तत्काळ द्यावी. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव अधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या मंडळांची यादी संबंधित पोलिस ठाण्याला द्यावी, असे आदेशही त्यांनी बजावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here