महावितरणाच्या रखडलेल्या कामांमुळे त्रास

0

कणकवली : वीज यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी महावितरणने ‘इन्फ्रास्ट्रक्चर योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, गेल्या आठ वर्षांत यातील बहुतांशी कामे पूर्ण न झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. कामे पूर्ण न करताच ठेकेदारांची बिले काढण्यात आली, मग कामे होणार कशी? जनतेला अखंडित वीजपुरवठा कधी मिळणार? अशा एकाहून एक प्रश्नांची सरबत्ती करत महावितरणचे क्वालिटी कंट्रोलचे मुख्य अभियंता अशोक नाळे यांना आ. वैभव नाईक यांनी जाब विचारला. नाळे यांनी अधिकारी आणि ठेकेदारांची बैठक घेऊन लवकरात लवकर ‘इन्फ्रा’तील व प्रलंबित कामे पूर्ण करण्याची ग्वाही दिली. मुख्य अभियंता अशोक नाळे हे गुरुवारी कणकवलीच्या विभागीय महावितरण कार्यालयात आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर वीज संबंधित कामांचा आढावा घेण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी त्यांची बैठक घेतली. कार्यकारी अभियंता संजय गवळी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत यावेळी उपस्थित होते. महावितरणच्या ‘इन्फ्रा’ योजनेतून गेल्या आठ वषार्ंत एकही काम पूर्ण झालेले नाही.परिणामी जीर्ण झालेले पोल आणि लाईनमुळे सातत्याने वीज समस्या उद्भवत आहेत. गेला महिनाभर तर शहरी आणि ग्रामीण भागातही विजेचा लपंडाव सुरू आहे. ज्या ठेकेदार कंपन्यांना ही कामे देण्यात आली आहेत, त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या सोप्या कामाव्यतिरिक्त पोल बदलणे, लाईन ओढणे ही आवश्यक कामेच केलेली नाहीत. मात्र, तरीही ठेकेदारांची बिले काढण्यात आली आहेत. याबाबत आ. वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. आपण मुख्य अभियंता म्हणून या कामांचा पाठपुरावा करणे गरजेचे होते, मात्र आपल्याकडून ते झालेले नाही, याची जाणीवही त्यांना आमदारांनी करून दिली. कणकवली शहरातील अंडरग्राऊंड केबलच्या कामाबाबतही त्यांनी मुख्य अभियंत्यांचे लक्ष वेधत या कामाची 31 मार्च रोजी मुदत संपूनही काम का झाले नाही? अशी विचारणा केली. यावेळी कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी या कामाला मुदतवाढ मिळाल्याचे सांगितले. कणकवली, मालवण तालुक्यात महावितरणची अनेक कामे प्रलंबित आहेत. सिंधुदुर्गात वीजबील थकबाकी मोठ्या प्रमाणात नसतानाही पुरेसे कर्मचारी दिले जात नाहीत. त्यामुळे कंत्राटी कर्मचार्‍यांवर अवलंबून रहावे लागते. सध्या सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा पाहता जुने पोलवाहिन्या तत्काळ बदला. दिवाळीनंतर व मे महिन्यात वाहिन्यांवरील झाडे तोडण्यात यावीत. ठेकेदारांनी घेतलेल्या कामांचा आढावा वेळोवेळी घ्या. अंडरग्राऊंड केबलचे काम पूर्ण करा, अशा सूचना आ. नाईक यांनी केल्या. यावेळी मुख्य अभियंता श्री. नाळे यांनी कामे प्रलंबित राहण्याचे मान्य करत यापुढे पाठपुरावा करून ती मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यावेळी अशोक नाळेे यांनी  विजेच्या प्रश्नांविषयी आ. वैभव नाईक यांना अभियंत्यांपेक्षा अधिक माहिती आहे. त्यांच्या बोलण्यातून याचा सखोल अभ्यास असल्याचे कळते. त्यांचे महावितरणला सहकार्य मिळते. विजेची कामे करण्यात आम्हीच कमी पडलो. ठेकेदार व अधिकार्‍यांची बैठक घेऊन ‘इन्फ्रा’तील कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी नवीन ठेकेदार नेमले जातील, अशी ग्वाही श्री. नाळे यांनी दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here