उत्सवाला कोणत्याही प्रकाराचे गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्या!

0

मालवण : गणेशोत्सव व मोहरम सणाच्या काळात नागरिकांनी सहकार्य करत हे दोन्ही सण उत्साहात साजरे करावेत.गणेशमूर्तीचे विसर्जन करताना वेळेचे बंधन पाळावे. न्यायालयाच्या आदेशानुसार विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी, डिजेला पूर्णपणे बंदी आहे. केवळ पारंपरिक वाद्यांना परवानगी आहे. मात्र, उत्सवाला कोणत्याही प्रकाराचे गालबोट लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. दोन्ही सण  उत्साहात साजरे करण्यासाठी प्रशासनाचे सहकार्य असेल असे तहसीलदार अजय पाटणे यांनी सांगितले. मालवण पोलिस ठाण्याच्या सिद्धिविनायक सभागृहात तालुका शांतता समितीची बैठक तहसीलदार पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.  नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, बसस्थानक प्रमुख सचेतन बोवलेकर, सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता प्रदीप पाटील, महावितरणचे गुरुदास भुजबळ, योगेश खैरे, बीएसएनएलचे श्री. पगारे, प्रसाद आचरेकर, स्वाती जाधव तसेच शहरातील स्पीकर, ट्रॅव्हल्स व्यावसायिक नागरिक उपस्थित होते. शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाबरोबर गृहरक्षक दलाचे जवानही तैनात असणार आहेत. सर्व खासगी बसेस, अवजड वाहने ही सागरी महामार्गावर उभी केली जाणार आहेत. असे पोलिस निरीक्षक श्री. चौधरी यांनी स्पष्ट केले. भानुदास येरागी यांनी गणेशोत्सव कालावधीत तरी तारकर्ली व देवबागच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. बीएसएनएल रेंजची समस्याही नागरिकांनी यावेळी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here