राजापूर तालुक्यात तब्बल २१ शिक्षकांना कामगिरी

0

राजापूर : गेली अनेक वर्षे राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार प्रभारींच्या हाती आहे. मे महिन्यात झालेल्या संवर्ग तीन, त्यानंतर झालेल्या संवर्ग 5 च्या शिक्षक बदल्या व त्यानंतरही शून्य शिक्षकी झालेल्या तालुक्यातील 20 शाळांमधील घोळ अद्यापही कायम आहे. तब्बल 21 शिक्षकांना कामगिरी काढण्यात आल्याने याप्रकरणी मोठा गोलमाल  झाल्याची चर्चा आता शिक्षकांमधूनच करण्यात येत आहे.  या कारभारात तालुक्यातील मुलांचे नुकसान झाले आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदरच जिल्हा परिषदेने तालुक्यातील रिक्त शाळांची माहिती राजापूर शिक्षण विभागाकडून मागवली होती. त्याबाबतचे नियोजनही शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. मात्र गत वर्षापासून बदली प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे शिक्षण विभागात होणार्‍या अर्थपूर्ण व्यवहारांना चाप बसला होता. मात्र राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी व काही कर्मचार्‍यांनी यावर नामी शक्कल लढवत तालुक्यातील काही शाळा कशा रिक्त राहतील? याची खबरदारी घेतली. त्यातूनच गोलमाल झाल्याचा आरोप काही शिक्षकांमधून करण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या शिक्षक संघटनांसह लोकप्रतिनिधी सामील असल्याचा आरोप शिक्षक व पालक वर्गातून करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेने संवर्ग 3 म्हणजेच विनंती बदल्या मे महिन्यामध्ये केल्या. त्यानंतर संवर्ग 5 मधील शिक्षकांच्या बदल्याही केल्या. मात्र या दोन्ही बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही राजापूर तालुक्यातील तब्बल 20 शाळा शून्य शिक्षकी राहिल्या. या 20 शाळा शून्य शिक्षकी हेतूपुरस्सर ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या सगळ्या नाट्यानंतर राजापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने कामगिरी काढून गोलमाल केल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात 20 शाळा शून्य शिक्षकी असताना राजापूर शिक्षण विभागाने तब्बल 21 शिक्षकांना कामगिरीवर काढले. त्यातही संवर्ग 3 व 5 मधून नव्याने राजापूर तालुक्यात आलेले शिक्षकच जास्त होते. प्रारंभी या कामगिरी बदल्यांना शिक्षकामधूनच विरोध करण्यात आला व संघटना पातळीवर हा विषय घेण्यात आला. मात्र शिक्षक संघटनांच्या पुढार्‍यांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवल्याने अखेर काही शिक्षकांनीच कामगिरी शाळेवर जाण्यास नकार दिला. अखेर पालकवर्गातून याविरूद्ध आवाज उठवला व काही पालकांनी आपल्या पाल्यांना गटशिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात आणून शाळा भरवली. तालुक्यातील हातिवले शाळेतील एका शिक्षकाला कामगिरीवर काढण्यात आले व त्या शाळेतील एक शिक्षक कमी झाल्याने दुसर्‍या शाळेतील एका शिक्षिकेस हातिवले शाळेवर कामगिरी देण्यात आली. कामगिरी काढण्यात आलेल्या 21 शिक्षकांच्या यादीत या शिक्षिकेचा समावेशही नव्हता. मात्र त्या शिक्षिकेची पूर्वीची शाळा तिला सोयीची नव्हती म्हणून तिला सोयीची शाळा दिली गेल्याचे बोलले जात आहे. 6 पटाच्या तालुक्यातील शेढे शाळेत असणार्‍या 2 शिक्षकांपैकी एका शिक्षकाला दुसर्‍या शाळेवर कामगिरी देण्यात आली. मात्र कामगिरीवर न गेल्यास कारवाई करण्यात येईल, असा दम देणार्‍या राजापूर शिक्षण विभागाने त्या शिक्षकाची महाळुंगे शाळेवर काढण्यात आलेली कामगिरी रद्द केली. त्यामुळे या प्रकरणातही गोलमाल झाल्याचे उघडपणे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here