सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेचा खेळखंडोबा

0

कुडाळ :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक प्रामाणिकपणे वीज बिले भरणा करतात, तरी तुम्ही विजेचा खेळखंडोबा करता? काही अधिकारी मीटर देण्यासाठी पैशांची मागणी करतात? चेंबरमध्ये ठेकेदारांना बसवून घेतात? काय चाललय महावितरणमध्ये? असे रोखठोक सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत यांनी अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना  जाब विचारला. अखेर  गणेशोत्सवात जिल्ह्यातील वीज ग्राहकांना 24 तास सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली. कुडाळ शहर, ग्रामीण भाग व जिल्ह्यातील सर्वत्र भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. गणेशोत्सव जवळ आला असतानाही विजेचे प्रश्न जैसे थे असल्याने कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरूवारी एमआयडीसी येथील महावितरणच्या अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांच्यासमोर जिल्ह्यातील समस्यांचा पाढा या शिष्टमंडळाने वाचला. महावितरणचे अधिकारी   फोन उचलत नाहीत, उचलले तर ही हद्द आपली नाही, त्यांची आहे, अशी बेजबाबदार उत्तरे देतात, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.  गणेशोत्सवात जर विजेचा खेळखंडोबा होता नये, जर झालाच तर पुढील परिणामांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा दिला. महावितरणकडून दिले जाणारे वीज मीटर सदोष असल्याचा आरोप आर.के.सावंत यांनी केला. राष्ट्रवादीच्या या आक्रमक भूमिके नंतर सर्व समस्यांची महावितरणकडून दखल घेतली जाईल व कोणत्याही परिस्थितीत वीज ग्राहकांना गणेशोत्सवात त्रास होणार नाही, याची आम्ही खात्री देत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर परब, सेल अध्यक्ष बाळ कनयाळकर, संग्राम सावंत, प्रसाद पोईपकर, अशोक कांदे आदी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here