‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत शंभर वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आढळले ठणठणीत

0

संगमेश्वर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा पिरंदवणे येथे पहिल्या सात दिवसांचा टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. यामध्ये सकारात्मक बाब म्हणजे अभियान राबविताना शंभर वर्षांवरील वयाचे दोघे, तर ८५ ते १०० वर्षे वयाचे १० ज्येष्ठ नागरिक प्रकृतीने अगदी ठणठणीत असल्याचे आढळून आले आहे. तर कोरोनाच्या काळात जन्म झालेल्या ४ बालकांची प्रकृतीही उत्तम आहे. पिरंदवणे येथे ग्रामपंचायत सदस्य, करोना ग्राम कृती समिती आणि सर्व वाडी कृती समितीच्या बैठकीत या अभियानाचे गांभीर्य समजून घेतले आणि त्याची अंमलबजावणी करायचे ठरवले. सरपंच सौ. माधवी गुरव, ग्रामसेविका सौ. माया गुरखे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गमरे, सौ. अंजली झगडे तसेच ग्राम कृती दलाच्या सदस्यांनी बैठकीत भाग घेतला फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका सौ. एस. आर. भोजे, आशा पर्यवेक्षिका सौ. एस. आर. देसाई यांचे मार्गदर्शन घेतले. गावात कार्यरत आशाताई श्रीमती सुप्रिया मेस्त्री यांनी मोहिमेसाठी आवश्यक प्रशिक्षण घेतले होते. स्वयंसेवक म्हणून काम पाहणाऱ्या योगेश मुळे व कु. श्वेता गमरे यांनीही ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण केले होते. गेल्या १८ सप्टेंबरला ब्राह्मणवाडीतील श्रीमती लक्ष्मी भगवान धोपट यांच्या घरी या अभियानाचा प्रारंभ झाला. त्यानंतर गेल्या सात दिवसांत २२० घरांना भेट देऊन ७५२ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. तरुणांनी या काळात सर्वच भागांत उत्तम कार्य केल्याने गेल्या सहा महिन्यात गावात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती सरपंच सौ. गुरव यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:58 PM 26-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here