जिल्ह्यात होणार पेपरलेस आर्थिक गणना

0

सिंधुदुर्गनगरी : देशात होणार्‍या राष्ट्रव्यापी 7 व्या आर्थिक गणनेमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी, कुटुंब, उद्योग यांना भेट देऊन करण्यात येणार आहे. सदर गणनेचे काम कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्याकडून नेमण्यात आलेल्या प्रगणकांकडून केले जाणार आहे. या गणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सातव्या आर्थिक गणनेच्या अनुषंगाने नुकतीच जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली. जिल्हा सांख्यिकी अधिकारी अभिजीत कुलकर्णी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अँथोनी थॉमस, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक परशुराम गावडे, नगर प्रशासन अधिकारी संतोष जिरगे, विशेष निमंत्रीक सदस्य डॉ. काकडे व प्रा. सुरवसे, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगर पालिका, पंचायत तसेच ग्रामपंचायत स्तरावरील अधिकार्‍यांनी आर्थिक गणनेच्या कामी कॉमन सर्व्हिस सेंटर यांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले. प्रगणकांची नियुक्ती व त्यांचे प्रशिक्षण लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कॉमन सर्व्हिस सेंटरच्या जिल्हा व्यवस्थापकांना केल्या. जिल्हा साख्यिंकी अधिकारी यांनी सांगितले की, प्रथमच मोबाईल अ‍ॅपद्वारे आर्थिक गणना होत आहे. आर्थिक गणनेच्या क्षेत्रकामासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर यांचेकडून नेमण्यात आलेले प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी, कुटुंब, उद्योग यांना भेट देऊन सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना करणार आहेत. यावेळी कॉमन सर्व्हिस सेंटर, जिल्हा व्यवस्थापक प्रसाद जाधव यांनी आर्थिक गणना कशाप्रकारे राबविण्यात येणार आहे याचे सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here