रत्नागिरी : गणेशोत्सवानंतर येणार्या अंगारकी संकष्टीनिमित्त लाखो भक्तगण गणपतीपुळे येथे येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने देवस्थान व्यवस्थापनासह ग्रामपंचायत, हॉटेल यांची बैठक तहसीलदार शशिकांत जाधव यांनी घेऊन आढावा घेतला. अंगारकीनिमित्त प्रथमच अशा पध्दतीने बैठकीचे नियोजन केले गेले होते. अंगारकीनिमित्ताने येणार्या भाविकांना अनेक समस्यांना काही वेळा सामोरे जावे लागते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेकडून आढावा घेण्यात आला. वीस दिवस आधीच बैठक घेऊन सूचवलेल्या सुधारणा केल्या जातात की नाही याची तपासणीही तहसीलदार जाधव हे करणार आहेत. दरवर्षी अंगारकीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून सुमारे एक ते दीड लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. गणेशोत्सवानंतर अंगारकी येत असल्याने यावर्षी दीड लाखापेक्षा अधिक भाविक येण्याच्या दृष्टीने तयारी सुरु करण्यात आली आहे. अंगारकी संकष्टी दरम्यान, मागील वेळी काही त्रुटी राहिल्या होत्या याबाबतही विचारणा तहसीलदार श्री. जाधव यांनी सबंधित विभाग व ग्रामस्थ, देवस्थान व ग्रामपंचायत यांना केली. प्रत्येक विभागाने आपआपले नियोजन, पुरविण्यात येणारे मनुष्यबळ, उपलब्ध करुन देण्यात येणारी व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये तहसीलदार जाधव यांनी काही विभागांना सूचना दिल्या. या सूचनांची अंमलबजावणी होण्यासाठी दि. 13 सप्टेंबर रोजी आढावा घेणार असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले. या सभेला गणपतीपुळे देवस्थान व्यवस्थापनाचे सरपंच डॉ. विवेक भिडे, गणपतीपुळे ग्रामपंचायत सरपंच, देवस्थान व्यवस्थापन समिती सदस्य मेंहेंदळे, ग्रामपंचायत सदस्य, हॉटेल व लॉजींग संघटना अध्यक्ष, महावितरण विभागाचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी, मंडल अधिकारी मालगुंड, तलाठी मालगुंड, पोलीस पाटील गणपतीपुळे इ. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
