मुंबई : बेस्ट कामगार नेत्यांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी आंदोलनाला वेगळी कलाटणी मिळाली. खासदार नारायण राणे यांच्या आवाहनानंतर बेस्ट कामगारांनी गौरीगणपती विसर्जन म्हणजे ७ सप्टेंबरपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे. या काळात कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असे आश्वासन राणे यांनी वडाळा बस आगारातील उपोषणकर्त्यांना दिले.नवीन वेतन करार, सानुग्रह अनुदान आदी मागण्यांसाठी बेस्ट कामगारांचे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांत करार होईल, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत असल्याने कृती समितीच्या नेत्यांनी संप पुढे ढकलून बेमुदत उपोषण सुरू केले. मंगळवारी बेस्ट प्रशासनाबरोबर वाटाघाटी फिस्कटल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू राहिले. मात्र कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती गुरूवारी खालावली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी संध्याकाळी वडाळा बस आगारात उपोषणाला बसलेले कामगार व नेत्यांची भेट घेतली. गणेशोत्सव काळात कामगार गावी जातो, मुंबईकरांचाही उत्साह आहे. त्यामुळे गौरीगणपती विसर्जनापर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन त्यांनी केले. राणे हे स्वत: कामगार नेते होते, बेस्ट समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यामुळे आंदोलनात साथ देण्याच्या त्यांच्या आश्वासनानंतर बेस्ट कामगारांनी उपोषण मागे घेतले.
