रत्नागिरी/कणकवली : गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असतानाच केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम म्हणून कोकण रेल्वे मार्गावरून दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात गावी येण्यासाठी या गाड्यांचे आरक्षण चार ते पाच महिन्यांपूर्वी अनेक चाकरमान्यांनी केले होते. मात्र, गाड्याच रह झाल्याने त्याचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. या गाड्या कमीत कमी मडगावपर्यंत सोडाव्यात, अशी मागणी आरक्षण घेतलेल्या चाकरमान्यांमधून होत आहे. गणेशोत्सवात कोकणात येण्यासाठी चाकरमानी सर्वाधिक पसंती कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना देतात. नियमित मडगावपर्यंत सोडणाऱ्या गाड्यांबरोबरच दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचेही आरक्षण चाकरमानी करत असतात. गणेशोत्सवापूर्वी चार ते पाच महिने अगोदर आरक्षण करून गावी येण्याचे हे चाकरमानी निश्चित करत असतात. रेल्वेचे आरक्षण मिळाल्याने हे चाकरमानी खरे तर निर्धास्त असतात. त्यात नियमितच्या गाड्यांचे आरक्षण मिळाले की, वेळेत कोकणात पोहोचता येईल, असा चाकरमान्यांचा विश्वास असतो. मात्र, यावर्षी लांब पल्ल्याच्या रेल्वे अचानक रद्द झाल्याने त्याचा फटका या गाड्यांचे आरक्षण घेतलेल्या चाकरमान्यांना बसला आहे. तिरुवअनंतपूरम रेल्वे स्थानकाजवळ रूच्यावर डोंगरावरून माती आल्याने कोकण रेल्वे मार्गावरून केरळच्या दिशेने जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. अचानक रद्द केलेल्या गाड्यांमध्ये पुणेएनाकुलम, नेत्रावती, ओखा अशा गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी डहाणू, विरार, वसई, पनवेल आदी भागातील चाकरमान्यांनी चार महिने अगोदरच आरक्षण घेतले होते. मात्र, गाड्या रद्द झाल्याने पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी त्यांना धावाधाव करावी लागत आहे. चाकरमान्यांची संख्या विचारात घेताया प्रवाशांची हॉलिडे स्पेशल गाड्यांमधून व्यवस्था करणे आवश्यक होते. अथवा या गाड्या मडगावपर्यंत सोडल्या असत्या तर चाकरमान्यांची व्यवस्था झाली असती. तसे न करता रेल्वे प्रशासनाने तिकिटाची रक्कम परत केल्याने ऐनवेळी पर्यायी व्यवस्था शोधण्याचा त्रास चाकरमान्यांचा सहन करावा लागत आहे.
