रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना खासगीरित्या फॉर्म नं.१७ भरून परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०२० च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्ज (फॉर्म क्र.१७) ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नियमित शुल्काने भरण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. नियमित शुल्काने नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याची मुदत २७ ऑगस्ट ते १० सप्टेंबर असून या कालावधीत विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावेत. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहीत शल्क व मळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये २८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत जमा करावेत. संपर्क केंद्र शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहीत शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे १६ सप्टेंबर रोजी जमा करावेत. खासगी विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज http://form17. mh-ssc.ac.in, http://form17.mh-hsc. ac.in या संकेतस्थळावर भरावेत. अर्ज भरण्याच्या सूचना संकेतस्थळावर मराठी, इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. नावनोंदणी शुल्क दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता १००० रूपये नोंदणी शुल्क व १०० रूपये प्रक्रिया शुल्क तर बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता ५०० रुपये नोंदणी शुल्क व १०० रुपये प्रक्रिया शुल्क आहे. ऑनलाईन माहिती भरताना कोणतीही अडचण निर्माण आल्यास कार्यालयीन वेळेत तांत्रिक बाबीकरिता दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
