रियो दि जानेरो : भारताची नेमबाज इलावेनिल वलारिवान हिने महिलांच्या वर्ल्डकप नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला बनली असली तरी तिला ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यात मात्र अपयश आले. यापूर्वी अपूर्वी चंदेला आणि अंजुम मुद्रील यांनी भारताच्या वाट्याची दोन ऑलिम्पिक तिकिटे मिळवली आहेत.वरिष्ठ गटातून पहिल्यांदाच खेळणार्या इलावेनिलने बुधवारी झालेल्या अंतिम फेरीत 251.7 गुण मिळवले. तिने ब्रिटनच्या सियोनाद मॅकिन्तोश हिला मागे टाकून सुवर्णपदकावर कब्जा केला. इलावेनिलच्या पूर्वी भारताकडून अंजली भागवत आणि अपूर्वी चंदेला या दोघींनी या गटातील सुवर्णपदके जिंकली आहेत. इलावेनिल ही तिसरी भारतीय ठरली आहे.
