पैसे वापरल्याच्या संशयातून एकास तोंडात मिरच्या कोंबून बेदम मारहाण; १४ जणांविरोधात गुन्हा दाखल

0

चिपळूण : बिअर शॉपीतील ३ लाख रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याच्या संशयातून चिपळुणात एकास कपडे उतरवून त्याच्या तोंडात मिरच्या, आले कोंबून बेदम मारहाण झाली आहे. या प्रकरणी १४ जणांविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी चिंचनाका येथील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये घडली. सूरज विनायक मोरे (२४), अलोक उदय चव्हाण (२५, दोन्ही रा. काविळतळी, चिपळूण) आणि इतर १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात दीपक दत्ताराम लटके(३८, रा. पागझरी रोड, चिपळूण) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार, दीपक लटके हे सूरज मोरे याच्या बीअर शॉपीमध्ये कामाला होते. लॉकडाऊनच्या काळात दीपक लटके यांनी बीअर बॉक्स विकून ३ लाख रुपये स्वतः वापरले असा संशय सूरजने घेतला. पैसे घेतल्याचे कबूल कर असे मोरेने लटकेला सांगितले. २९ सप्टेंबर रोजी दीपक लटके कामावर जाण्यासाठी बहादृशेख येथे आले असता सूरज मोरे झायलो गाडीतून तिथे आला. त्याने दीपकला गाडीतून चिंचनाका येथील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये नेले. तिथे सूरजचे अन्य साथिदारही होते. त्यांनी दीपकला पैसे घेतल्याचे कबूल कर असे म्हणत दमदाटी केली. तेव्हा त्याने तसे कबूल न केल्याने सूरज आणि अलोक चव्हाण या दोघांनी दीपकचे कपडे उतरवून त्याच्या तोंडात मिरच्या आणि आले कोंबले. त्यानंतर लाथा-बुक्क्याने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. तेव्हा दीपकची आई त्याला सोडवण्यासाठी तेथे आली असता तिलाही सूरजने धक्का देत शिवीगाळ केली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:30 PM 02-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here