रत्नागिरी : राष्ट्रवादीचे आ. भास्कर जाधव यांचा शिवसेनेतील प्रवेश हा जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते व त्यांचा मुलगा विक्रांत जाधव हे सुद्धा हाती भगवा झेंडा घेणार असल्याचे समजते. त्याचबरोबर सात ते आठ राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्यही भास्कर जाधव यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषकरून तोडफोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. रत्नागिरीत आ. उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक मुसा काझी आणि सुहेल मुकादम यांना शिवसेनेचा मार्ग दाखवला आहे. त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे नेते आणि कार्यकर्त्यांनाही मातोश्रीवारी घडवून आणली. आता चिपळूण, गुहागरातील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.
चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते व आ. भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर जाऊन सेना पक्ष कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. सुरुवातीला भेटच घेतली नसल्याचे भासवले जात होते. परंतु, सेनेच्या मुखपत्रातून ही भेट जाहीर झाली. यानंतर स्वत: भास्कर जाधव यांनी भेटीची कबुली दिली. यानंतर चिपळूण येथे शुक्रवारी समर्थकांच्या बैठकीत दोन दिवसांत पक्षांतर करण्याचे संकेत दिले. यामुळे भास्कर जाधव हे आता सेनेत जाणार, हे निश्चित मानले जात आहे. आ. भास्कर जाधव आपल्या समर्थकांसह सेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये त्यांचा पुत्र व जि. प.मधील विरोधी पक्षनेता विक्रांत जाधव यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गुहागर व चिपळूणमधील काही सदस्यही भगवा हाती घेणार आहेत. यामुळे जिल्हा परिषदेमधील सेनेची ताकद वाढणार हे निश्चित आहे. सध्या सेनेचे 39, राष्ट्रवादीचे 15 व काँग्रेसचा 1 असे सदस्य बलाबल आहे. जर विक्रांत जाधव यांच्यासह राष्ट्रवादीचे सात ते आठ सदस्य गेले तर सेनेची जि. प.मधील ताकद वाढणार आहे.
