रत्नागिरी : जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय समितीने पाहणी केली. जिल्ह्यात सुमारे 407 कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले असून, यातील सुधारणा करण्यासाठी 448 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. चिपळूण तालुक्यातील फुटलेल्या तिवरे धरणाची केंद्रीय समितीचे अर्थमंत्रालयातील चित्तरंजन डॅश, ऊर्जा मंत्रालयातील ओम किशोर व केंद्रीय जल आयोगाचे मिलिंद पानपाटील यांनी पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पाच नद्यांना जुलै व ऑगस्ट महिन्यात अकरा वेळा पूर येऊन मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली. जूनमध्ये 90 टक्के, जुलैमध्ये 117 टक्के तर ऑगस्टमध्ये 121 टक्के पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात झाली आहे. कमी कालावधीत सर्वाधिक पाऊस पडल्याने मोठे नुकसान जिल्ह्याला सोसावे लागत आहे. पावसामुळे धरणफुटी व अन्य घटनांमध्ये 31 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. जिल्ह्यात बांधकाम विभागाचे सर्वाधिक 345 कोटींचे नुकसान झाले आहे. एक कोटी 21 लाखाचे पाणी योजना, खारलॅण्ड बंधार्यांचे 98 लाख, जेटींचे सुमारे 11 कोटी, जलसंपदा विभागाचे 10 कोटी तर महावितरणचे सुमारे 38 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या व्यतिरिक्त 40 कोटी असे सुमारे 448 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी शासनाकडे 22 ऑगस्ट रोजी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जिल्ह्यात राजापूर पासून मंडणगडपर्यंत सह्याद्रीच्या पट्ट्यातील एक हजार गावे डोंगराळ असल्याने मोठा फटका कनेक्टीव्हिटीला बसत आहे. निवडणुकीच्यावेळीही 120 ठिकाणी मतदानाच्यावेळी याचा फटका बसला होता. पॉस मशिनलाही रेंज नसल्याने धान्य वितरणात असुविधा निर्माण होत आहेत. त्यामुळे बीएसएनएलच्या सेवेबाबतही चर्चा करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
