ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे चिपीवरून विमानोड्डाणास विलंब

0

सावंतवाडी : केवळ आयआरबी या ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे यावर्षी  ‘चिपी’ विमानतळावर विमान उतरू शकले नाही, असा आरोप खा. विनायक राऊत यांनी केला. या ठेकेदार कंपनीला टर्मिनेट करून  विमानतळ  राज्य किंवा केंद्र शासनामार्फत  चालवा, अशी मागणी आपण उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली असल्याचेे ते म्हणाले.जनशताब्दी एक्स्प्रेसला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर शुक्रवार पासून थांबा देण्यात आला आहे. या गाडीचे स्वागत करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात खा. राऊत बोलत होते. पालकमंत्री दीपक केसरकर, सावंतवाडी सभापती पंकज पेडणेकर, उपसभापती संदीप नेमळेकर, उपनगराध्यक्षा अन्‍नपूर्णा कोरगावकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, जि.प. गटनेते नागेंद्र परब. उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी,  निरवडे सरपंच प्रमोद  गावडे,  कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी.के. सावंत, सावंतवाडी न. प. मुख्याधिकारी संतोष जिरगे,  पं. स. माजी सदस्य  नारायण ऊर्फ बबन राणे,  नगरसेविका आनारोजीन लोबो, न. प. महिला व बालकल्याण सभापती भारती मोरे, विक्रांत सावंत आदी उपस्थित होते. खा. राऊत म्हणाले, आयआरबी कंपनीच्या निष्क्रियतेमुळे विमानतळाला परवानगी असूनही विमान उतरू शकलेले नाही. विशेष म्हणजे चिपी विमानतळावर सर्व सोय उपलब्ध करण्यात आल्या असून वीज व  पाणी पुरवठ्यासाठी पालकमंत्र्यांनी भरीव निधी दिला आहे. अकरा केव्ही क्षमतेचा वीजप्रवाह विमानतळापर्यंत पोहोचला परंतु त्यासाठी आवश्यक  ट्रान्सफार्मर कंपनीने बसविला नसल्यामुळे वरिष्ठ यंत्रणेने परवानगी देण्यास नकार दिला.त्यामुळे विमान उतरू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोणी केवळ टीका करण्यासाठी टीका करीत असतील तर ते चुकीचे आहे. येणार्‍या काळात लोकांची मागणी लक्षात घेता त्या ठिकाणी विमानतळ सुरू होणे काळाची गरज आहे. त्यामुळे निष्काळजीपणा दाखवणार्‍या संबंधित ठेकेदाराला तत्काळ टर्मिनेट करून विमानतळ ताब्यात घ्या, अशी मागणी आपण केल्याचे  खा. राऊत यांनी सांगितले. चिपी वरुन विमान उडू देणार नाही, असे काहीजण सांगत आहेत.  खरेतर ज्यांनी आयुष्यभर विकासकामांना विरोध केला ते आणखीन काय करणार? असा उपरोधिक सवाल  खा. राऊत यांनी उपस्थित केला.  हे विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर व आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्प्याने करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भारतीय रेल्वेकडे पंधरा हजार कोटीची मागणी करण्यात आली आहे.रोहा ते वीर आणि वीर ते रायगड असे दुपदरीकरण झाल्यानंतर पुढील टप्प्यात सावंतवाडी पर्यंत दुपदरीकरणाचा विचार करण्यात येणार आहे.  सावंतवाडी स्टेशनला टर्मिनन्सचा दर्जा मिळाल्याने  या रेल्वे स्थानकावर बर्‍याच गाड्यांना थांबा मिळेल, असा विश्‍वास खा.राऊत यांनी  व्यक्‍त केला. या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यात याव्यात, अशी येथील लोकांची गेली अनेक वष मागणी होती. त्यासाठी कोकण प्रवासी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाची दखल घेऊन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून जनशताब्दी गाडी याठिकाणी थांबविण्यात यश आले आहे. भविष्यात आणखी काही गाड्या येथे थांबविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सहा लाख चाकरमान्यांना कोकण रेल्वे ने-आण करते. तुतारी एक्स्प्रेसला जादा बोगी देण्याचे सीएमडी ए. के गुप्ता यांनी मान्य केले आहे. त्यामुळे आता 19 बोगींची तुतारी धावेल. कोकण रेल्वेसाठीसाठी पार्किंगची व्यवस्था, सर्व स्थानकावर विश्रामगृह व इतर कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षांत जिल्ह्यात आणखी नवीन स्थानके उभी करण्याचा प्रयत्न असल्याचे खा. राऊत म्हणाले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील बॅटरी ऑपरेट कार म्हणजेच ‘बगी कार’ साठीही कोकण रेल्वेला निधी मंजूर करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी   सांगितले. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रिक्षा स्टॅन्ड शेड तयार करण्यासाठी कोकण रेल्वेला थेट निधी दिला जाणार असून जनशताब्दी बरोबरच आणखीही ट्रेन सावंतवाडी येथे थांबवण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला नऊ कोटीचे रेलटेल हॉटेल सुरू केले जाणार असून या हॉटेलची पुन्हा एकदा निविदा काढण्यात येणार आहे. या ठिकाणी होणार्‍या सीएमडी कार्यालया कडे जाणार्‍या रस्त्यासाठी 86 लाख रुपये मंजूर करण्यात येणार असून त्यामुळे प्लॅटफॉर्म नंबर तीन वर जाण्यासाठी चालत जाण्याची गरज भासणार नाही . कोकण रेल्वेचे आर. एम. एम. उपेंद्र शेंडे यांनी प्रास्ताविकात रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांबाबत व रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सुविधांबाबतही  माहिती दिली.  रेल्वे टर्मिनसवर दु. 1.30 वा. जनशताब्दी एक्सप्रेस दाखल झाली. सर्व मान्यवरांनी जनशताब्दी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला तसेच मोटरमन मोहन खेडेकर, असिस्टंट संजय वराडकर यांनी कोकण रेल्वेला मान्यवरांच्या उपस्थितीत हार घालून तिचे टर्मिनसवर स्वागत केले. मोठ्या संख्येने नागरिक व प्रवासी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here