रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने भाविकांसाठी जवळपास अडीचशे जादा गाड्यांचे नियोजन आधीच केले असताना आता लो. टिळक टर्मिनस ते रत्नागिरीपर्यंत आणखी एका गणपती विशेष गाडीसह दादर ते सावंतवाडी दरम्यान धावणार्या तुतारी एक्स्प्रेसला गणेेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणखी चार जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतल्याने ही गाडी डब्यांची धावणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवा आता अवघे तीन दिवस उतरले असल्याने कोकणात येणार्या भाविकांचा ओघ वाढला आहे. कोकण रेल्वेकडून गणपती उत्सवासाठी मुंबई सीएसएमटी, मुंबई सेट्रल, वांद्रे, लोकमान्य टिळक टर्मिनस, अहमदाबाद, पनवेल तसेच पुणे येथून कोकणात येण्यासाठी जवळपास अडीचशे जादा गाड्या आधीच जाहीर केल्या आहेत. यातील काही गाड्या या आधीच धावू लागल्या आहेत. गणेशोत्सासाठी आता अवघे तीन दिवस उरल्याने मुंबई, पुण्यातून गणेशभक्तांचा कोकणात येण्यासाठी ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चाकरमान्यांची रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घे ऊन कोकण रेल्वेने लो. टिळक टर्मिनस ते रत्नागिरी 01227/01228 ही विशेष गाडी जाहीर केली आहे. ही गाडी दि. 30, 31 ऑगस्ट तसेच 1 सप्टेंबर रोजी लो. टिळक टर्मिनसहून रात्री 8 वा. 50 मिनिटांनी सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 6.40 वाजता ती रत्नागिरीला पोहचेल. ही गाडी (01228) दि. 31 ऑगस्ट तसेच 1 व 2 स्पटेंबर रत्नागिरी स्थानकातून सकाळी 8 वाजता परतीचा प्रवासाला निघेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 4 वा. 25 मिनिटांनी ती लो. टिळक टर्मिनसला पोहचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर हे थांबे घेत रत्नागिरीला तिचा प्रवास संपणार आहे. याचबरोबर कोकण रेल्वे मार्गावर धावणारी दादर -सावंतवाडी (1003/1004) या 15 डब्यांच्या गाडीला आधीच 4 डबे वाढवून ती 19 डब्यांची करण्यात आली आहे. आता वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेला या गाडीला आणखी चार डबे वाढविल्याने आता ही गाडी 23 डब्यांची धावणार आहे. दि. 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2019 या कालावधीसाठी हे जादा डबे जोडण्यात येणार आहेत.
