दापोली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे

0

खेड : दापोली विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमांचा धडाका सुरु झाला आहे. त्यानिमित्त गावभेटीच्या कार्यक्रमांवर भर देण्यात आला आहे. आगामी निवडणुकीचे वारे मतदारसंघात वाहू लागले असून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा रणसंग्राम सुरू झाला आहे. एका बाजूला सेनेने गमावलेला हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी युवा नेतृत्व योगेश कदम यांच्या रूपाने रणांगणात गेल्या चार वर्षांपासून उतरवले असतानाच राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना स्वबळावर शिवसैनिकांना तोंड द्यावे लागत आहे. मतदारसंघ पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीने सेनेतून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले संजय कदम यांच्या माध्यमातून काबीज केला आहे. सूर्यकांत दळवी यांनी पराभवानंतर सेना नेत्यांवर आरोप केले. त्यामुळे सेना नेतृत्वाने युवा सेनेत आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणारे योगेश कदम यांच्यावर दापोली मतदार संघात काम करण्याची जबाबदारी दिली. त्यांनतर योगेश कदम यांनी गेल्या चार वर्षात संघटन बांधणी सोबतच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकासकामांसाठी  कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केला. शिवसेनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन तसेच गावभेटींच्या कार्यक्रमांमुळे शिवसैनिकांमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पक्षांतरच्या चर्चा रंगत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच आमदार संजय कदम शिवसेना नेत्यांचा दौरा रोखण्यासाठी काही शिलेदार सोबत घेऊन प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. खेड तालुक्यातील नातूनगर, दापोली तालुक्यातील उन्हवरे व मंडणगड तालुक्यातील चिंचघर येथे सेनेच्या कार्यक्रमातच मंत्र्यांचा निषेध नोंदवण्याचे व  कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे झेंडे लावण्याचे प्रकार केले. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच रणसंग्राम सुरू झाल्याचे चित्र आहे. परंतु या रणसंग्रामात एका बाजूला सेनेची मोठी फौज तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम हे संभ्रमात असलेल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या झंझावाताला सामोरे जाताना दिसत आहेत. एकंदर दापोली विधानसभा मतदार संघ शिवसेनेने व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा बनवला असल्याने विधानसभा निवडणूक रणसंग्रामात कोकणात सर्वाधिक चुरस या मतदारसंघात पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी रंगत असली तरी इतर आघाड्याही चुरस देणार आहेत. मनसे आणि वंचित आघाडीही याठिकाणी महत्वाची ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here