मालवण : वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गतमहाराष्ट्रातीलमहत्त्वपूर्ण समुद्री संरक्षित प्रजातींच्या संरक्षणाकडे गंभीरपणे लक्ष देत असताना दुसरीकडे यंदाच्या हंगामात मोठ्या संख्येने समुद्री कासवं मृत्युमुखी का पडली, याचा शोधदेखील शासनाने घ्यायला हवा. बेकायदेशीररीत्या होणाऱ्या विध्वंसकारी एलईडी पर्ससीन मासेमारीमुळेच यंदा ही आपत्ती ओढवलीय, असे पारंपरिक मच्छीमारांचे मत असून शासनाने त्यादृष्टीने संशोधन करावे, अशी मागणी कुंभारमाठ येथे झालेल्या मत्स्य व वन विभागाच्या कार्यशाळेत करण्यात आली. कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालयात वन आणि मत्स्य विभागांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय प्रदीप वस्त, कांदळवन विभागाचे मानस मांजरेकर, रोहित सावंत, धनश्री बदाडे, सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, भाजप मच्छीमार सेलचे रविकिरण तोरसकर, विकी चोपडेकर, गंगाराम आडकर, जॉन न होना, मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर, महेशजुवाटकर आदी उपस्थित होते. बेकायदेशीर एलईडीमासेमारीमुळेच यंदा समुद्री कासवं मोठ्या संख्येने दगावली आहेत. प्रखर एलईडी दिव्यांमुळे कासवांना अंधत्व येते, असेही मच्छीमारांचे म्हणणे आहे. शासनाने या गोष्टीची शास्त्रीय पडताळणी करावी आणि कासवांच्या मृत्युमागचे सत्य समोर आणावे, अशी सूचना श्री. पराडकर व श्री. घारे यांनी मांडली.
