कणकवली : देशभरातील फिशमीलधारकांना पूर्वीचा थकीत जीएसटी माफ करावा, तसेच व्हॅटप्रमाणे शून्य जीसएटी करावा, या मागणीसाठी शुक्रवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया फिशमील ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अर्थमंत्र्यांनी येत्या १९, २० सप्टेंबरला जीएसटी कौन्सिलिंगची बैठक होणार आहे. या बैठकीत फिशमिलप्रश्नी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. दरम्यान, फिशमीलधारकांना बंद मागे घेण्याची विनंती केली, त्यानुसार तूर्तास बंद मागे घेतला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. प्रमोद जठार यांनी दिली. पूर्वीच्या व्हॅटमध्ये फिशमीलला सवलत होती; पण २०१७ मध्ये जीएसटी करप्रणाली आल्यानंतर २०१७ पासूनचा जीएसटी भरावा अशा नोटिसा देशभरातील फिशमिलधारकांना बजावण्यात आल्या होत्या. हा थकीत जीएसटी काही कोटींच्या घरात असल्याने याविरोधात देशपातळीवरील फिशमिलधारकांनी बंद पुकारला. त्यामुळे कारखान्यातील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराचा प्रश्न उभा राहिला. मत्स्योद्योगापुढे प्रश्न उभा राहिला. या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे या विषयावर चर्चा करण्याठी वेळ मागितली. ऑल इंडिया फिशमील ऑर्गनायझेशनच्या शिष्टमंडळाने प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी नवी दिल्लीत अर्थमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. फिशमिलधारकांवर लावण्यात आलेल्या जीएसटीमुळे त्यांच्यावर कसा अन्याय होत आहे ही बाब अर्थमंत्र्यांकडे स्पष्ट केली.
