रत्नागिरी : गणेशोत्सवादरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० खासगी आराम बसवर रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यावेळी सुमारे १ लाख ४० हजाराचा दंड ठोठावण्यात आला. चाकरमान्यांना घेऊन अनेक खासगी बस महामार्गावरुन धावत आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने या खासगी बसेसची तपासणी सुरु केली आहे. काही खासगी बसचालक नियमाला धरुन गाड्या चालवत नसल्याचे यावेळी लक्षात आले. या १० गाड्या जप्त करुन एसटीच्या माळनाका येथील वर्कशॉपमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. यातील काही गाड्यांना ५६ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला तर ८६ हजार रुपयांचा चुकवलेला टॅक्सही भरुन घेण्यात आला.
