रत्नागिरी : प्रदूषणाच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक उत्सवांच्या वेळी जागे होणाऱ्या संघटना वाहत्या पाण्यात गणेशमूर्तीच्या विसर्जनास विरोध करतांना दिसून येतात. याला दुर्लक्षून पूर्वापार धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात चालत आलेली गणेशमूर्ती विसर्जनाची पद्धती चालू राहू द्यावी, अशी मागणी रत्नागिरीतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रत्नागिरीचे प्र. नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि मुखाधिकारी ठोंबरे यांना नुकतेच एक निवेदन देऊन केली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष राकेश नलावडे, देवेंद्र झापडेकर, सुशील कदम, ऋषिकेश पाष्टे, हिंदु राष्ट्रसेनेचे रुपेश तावडे, रत्नागिरी ग्राहक पंचायतचे संस्थापक-सदस्य जयंत आठल्ये, श्री कालिका मंदिर ट्रस्ट, मिरजोळेचे श्रीराम नाखरेकर, शिवचरित्र कथाकार अरविंद बारस्कर, प्रफुल्ल पोंक्षे, संकेत पोंक्षे, सनातन संस्थेचे चंद्रशेखर गुडेकर, हिंदु जनजागृती समितीचे निलेश नेने, पुरूषोत्तम वागळे, संजय जोशी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, ‘लोकलेखा समिती’च्या अहवालानुसार शेकडो दशलक्ष लिटर सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता जसेच्या तसेच नद्या, तलाव आदी जलक्षेत्रांमध्ये सोडले जात आहे. राज्यातील २१,८०० मेट्रीक टन घनकचयपिकी १५,००० मेट्रीक टन घनकचर्याची विल्हेवाट लावली जात नाही.राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांना परिपूर्ण सांडपाणी व्यवस्थापन व नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठीचे निर्देश देण्यात येऊनही त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. मात्र तथाकथित पर्यावरणवादी गणेशमूर्तीचे दान करण्यास, तसेच कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास गणेशभक्तांना भाग पाडले जात आहे. त्यामुळे पूर्वापार परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनाची पद्धती चालू राहू द्यावी.
