संगमेश्वर : तालुक्यातील कचांबे मराठवाडी येथील पुलाला दहा लाख रूपये खर्चुन बांधलेली संरक्षण भिंत अंतिम बिल झाल्यानंतर केवळ पंधराव्या दिवशी भुईसपाट झाली आहे. जनसुविधांतर्गत करण्यात आलेल्या या कामाची केवळ पंधराव्या दिवशी पडझड झाल्याने तालुक्यातील अशा अनेक कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या सदोष कामावर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. कुचांबे मराठवाडी येथे बांधण्यात आलेल्या पुलाला संरक्षण भिंत बांधण्यासाठी जनसुविधा योजनेंतर्गत १० लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. या उन्हाळ्यात या संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले होते. ९ जुलै रोजी या कामाच्या अंतिम बिलास मंजुरी देण्यात आल्याचे समजते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे
काम पूर्ण होऊन अंतिम बिल झाल्यानंतर केवळ १४ व्या दिवशीच म्हणजे २३ जुलैला ही संरक्षण भिंत पडल्याचे समोर आले आहे. हे काम जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकानुसार झाले नसल्याची चर्चा सध्या परिसरात ऐकायला येत आहे. मात्र पंधरा दिवसाच्या आत कोसळणाऱ्या बोगस कामाबाबत तक्रार करण्यास येथील एकहीलोकप्रतिनिधी पुढे आला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे काम चालू असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची गुणवत्ता तपासूनच अंतिम बिल करणे अनिवार्य होते. आता अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रशचिन्ह निर्माण होत आहे. तालुक्यात अशी अनेक कामे सुरू असून त्यांची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून अशी कामे सूचवली जातात. अशी निकृष्ट कामे करून ठेकेदार जनतेच्या पैशाचा अपव्यय करत असून अशा ठेकेदारावर कारवाई होणार का? असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे.
