बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ‘रॅपिड रिस्पान्स टीम’

0

रत्नागिरी : गणेशगुळे, मेर्वी पंचक्रोशीत ग्रामस्थ आणि दुचाकीस्वारांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ‘रॅपिड रिस्पान्स टीम’ बोलाविण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाला करण्यात आला आहे. पहाटे आणि सायंकाळी या ठिकाणी १५ कर्मचारी बिबट्यावर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती परिक्षेत्रीय वनाधिकारी प्रियांका लगड यांनी दिली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले आहेत. परंतु त्यामध्ये बिबट्या सापडत नसल्याने आता नव्या पर्यायाचा शोध वनविभाग घेत आहे. यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. तब्बल पाच महिने बिबट्याने धुमाकुळ घालत सुमारे १३ जणांना जखमी केले आहे. दुचाकीस्वारांना बिबट्याने लक्ष्य केले होते. त्यामुळे पंचक्रोशीत सायंकाळी, पहाटे फिरणे धोकादायक झाले आहे. एकाचवेळी सातजणांना बिबट्याने जखमी केल्यानंतर वन विभागाने पावस ते मेर्वी परिसरात गस्तीत वाढ केली आहे. सायंकाळ, पहाटेच्या वेळेत सुमारे पंधरा कर्मचारी बिबट्यावर वाच ठेवून आहेत. तर दोन पिंजऱ्यांसह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. परंतु, चाणाक्ष बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकलेला नाही. बिबट्या एकाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला नाही. परंतु, स्थानिक ग्रमस्थांना बिबट्या दिसल्याने त्याचा वावर पंचक्रोशीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या न सापडल्याने अन्य पद्धतीने बिबट्याला पकडण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्यानंतर नव्या पर्यायाचा अवलंब केला जाणार आहे. रॅपिड रिस्पान्स टीमला या ठिकाणी बोलविण्यात आले असून, यासंदर्भातील प्रस्ताव चिपळूण कार्यालयात पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर टीम रत्नागिरीत दाखल होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here