राजापूर : राजापूर शहरातील मुख्य रस्त्याच्या दुरूस्तीकरिता मुख्यमंत्र्यांनी १ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. या निधीच्या माध्यमातून रस्त्याची दुरूस्ती करतानाच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रूंदीकरण तसेच भूमिगत गटार व्यवस्था करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी सांगितले. दरम्यान, गणेशोत्सवापूर्वी पथदीप दुरूस्ती, रस्त्यांवरील खड्डे भरणे, स्वच्छता आदी कामे मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे अँड. खलिफे यांनी सांगितले. पावसामुळे शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शिवाय अनेक पथदीप बंद अवस्थेत आहेत. मात्र गणेशोत्सवापूर्वी ही कामे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पथदीप बसविणाऱ्या ठेकेदार कंपनीला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीमार्फत पथदिपांचे काम करून घेणार असल्याचे खलिफे यांनी सांगितले. तसेच १४ व्या वित्त आयोगातून शहरात नवीन पथदीप बसविण्याच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी हायमास्ट दिवे बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील जकात नाका ते जवाहर चौक रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आमदार सौ. खलिफे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रस्ता रूंदीकरण तसेच भूमिगत गटाराचे काम करण्यात येणार आहे. तसेच रस्त्याचे काम प्लेवर मशिनच्या सहाय्याने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कामापूर्वी रखडलेले भूमिगत वीजवाहिन्यांचे कामही करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. वैशिष्ट्यपूर्ण निधीतून भाजी मार्केटचे सुशोभिकरण करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
