कुणबी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर सहविचार करण्यासाठी समन्वय सभा

0

रत्नागिरी : राज्यात ओबीसी आरक्षण व कुणबी समाजाचे सामाजिक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. अशा अनेक विषयांसंदर्भात सहविचार करण्यासाठीची समन्वय सभा रत्नागिरी जिल्ह्यात दोन भागात घेण्यात येणार आहे. येत्या 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वाजता कुणबी भवन रत्नागिरी येथे तर 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वाजता नवभारत हायस्कूल भरणे ता. खेड येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, लांजा आणि राजापूर या तालुक्यातील बांधवांसाठी रत्नागिरी येथे तर गुहागर, चिपळूण, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यातील बांधवांसाठी खेड येथे या सभा होणार आहेत. कुणबी समाजाचे सामाजिक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने त्या न्याय हक्कांसाठी तीव्र उग्र आंदोलन उभे करून आपले सर्व प्रश्न सोडविता येतील. त्यासाठी सामाजिक प्रश्नांची जाणीव करून घेणे, तसेच सामाजिक समस्यांची व्याप्ती समजून घेणे व त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रखर लढा उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे निमंत्रक नंदकुमार मोहिते यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना, मंडल आयोग, घराखालील जमिनी व शेतजमिनींच्या मालकी हक्काचे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, आरोग्याच्या समस्या, प्राथमिक व उच्चशिक्षण विषयक प्रश्न, बेरोजगारी आणि लोकनेते शामरावजी पेजे आर्थिक विकास महामंडळ निधी या अशा अनेक विषयांसंदर्भात सहविचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी दोन्ही सभेच्या ठिकाणी कुणबी समाजातील थोर विचारवंत, जेष्ठ नेते, जेष्ठ कार्यकर्ते, आजीमाजी जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, सर्व पंचायत समिती आजी माजी सभापती, पदाधिकारी, सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, प्रशासनातील सेवानिवृत्त अधिकारी, ऍडव्होकेट (वकील), डॉक्टर, इंजीनीअर्स, विविध कुणबी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सर्व राजकीय पक्षांतील कुणबी पदाधिकारी, या सर्वांची समन्वय सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे गांभीर्य लक्षात घेऊन सभेला उपस्थित रहावे, आवाहन निमंत्रक नंदकुमार मोहिते यांनी केलेले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:12 PM 07-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here