महाड : ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलनाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या ईव्हीएमविरोधी यात्रेचे आज महाडमध्ये आगमन झाले. शिवाजी चौक येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा चवदार तळे येथे नेण्यात आली. त्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपर लाव’ अशा घोषणा देण्यात आल्या. २३ ऑगस्ट रोजी मुंबई येथे या यात्रेस प्रारंभ झाला. मुंबई, नाशिक, मालेगाव, जळगाव, औरंगाबाद, जालना, सिंदखेडराजा, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, महाड अशी ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेबरोबर रवि भिलारे, फिरोज मिठीबोरवाला, ज्योती बडेकर, धनंजय शिंदे हे महाड येथे आले होते. महाड येथे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस धनंजय देशमुख, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोर्पे, राष्ट्रीय जनता दलाचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुदेश कळमकर, युवक काँग्रेसचे महाड विधानसभा अध्यक्ष स्वरुप खांबे, माजी नगरसेवक प्रदीप मेहता, राहूल पाटेकर, राहूल गुजर, प्रा. दीपक क्षीरसागर यावेळेस उपस्थित होते.
