नवी दिल्ली : क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बाद करणा-या गोलंदाजाला त्याच्या परिश्रमाचे फळ मिळाले आहे. अथर्व आंकोळेकर असे या गोलंदाचे नाव असून या त्याची १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. हा संघ श्रीलंकेत होणा-या युथ आशिया चषक स्पर्धेत खेळणार आहे. १८ वर्षीय अथर्व हा मुंबईचा असून त्याची आई वैदेही आंकोळकर या बेस्टमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. मुलाच्या उत्तुंग यशानंतर आई वैदेही यांना गगनही ठेंगणे झाले आहे. अथर्व हा डावखूरा फिरकी गोलंदाज आहे. त्याने अवघ्या ११ व्या वर्षी २०११ साली मुंबईत खेळल्या गेलेल्या एका सराव सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला आपल्या फिरकीने फसवत तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यावेळी सचिनही अथर्वच्या फिरकी गोलंदाजीने प्रभावित झाला. सामन्यानंतर मास्टर ब्लास्टरने अथर्वला स्व-स्वाक्षरीचे ग्लव्हज् भेट देवून त्याच्या प्रतिभेचे कौतुक केले. क्रिकेटचा वारसा नसलेल्या अथर्वने कष्ट, सातत्य, प्रतिभेच्या जोरावर भारताच्या १९ वर्षाखालील संघात स्थान मिळविले आहे. तो एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. अथर्व नऊ वर्षाचा असतानाच त्याचे वडील विनोद यांचे निधन झाले. ते बेस्टमध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर अथर्वची आई वैदेही यांनी पती विनोद यांची जागा घेत अथर्वचे क्रिकेटचे वेड जोपासले. वैदेही याही बेस्टमध्ये वाहक म्हणून काम करत आहेत. मात्र, त्यांनी मुलाच्या क्रिकेट खेळण्याच्या वेडाला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. त्याचेच आज फळ मिळाले आहे. गुणवत्तेच्या आधारावर अथर्वची निवड १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात झाली आहे.
