चिपळूण : गेले पाच दिवस चिपळूण, गुहागरसह जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आ. भास्कर जाधव काय करणार या बाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत, तर आ. जाधव आपल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांना आजमावत आहेत. त्यांचे समर्थक, ‘शेठ आम्ही तुमच्याबरोबरच’ असा विश्वास देत आहेत. मात्र, अजूनही आ. जाधव यांनी या चर्चेला स्वल्पविरामच ठेवला आहे. कोणताही निर्णय जाहीर न केल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आपण भेट घेतली हे वृत्त खरे आहे. असे सांगून आ. जाधव यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का दिला. त्यामुळे राष्ट्रवादीदेखील संभ्रमित झाली असून आ. जाधव नेमका कोणता निर्णय घेणार याबाबत शिवसेनेसह राष्ट्रवादीतही उत्सुकता ताणून राहिली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर याचीच चर्चा जास्त होत असून आ. जाधव यांनी मात्र या बाबत कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे ही उत्सुकता आणखीनच शिगेला पोहोचली आहे. चिपळूणमधून सलग दोनवेळा आमदार, त्याचप्रमाणे गुहागरमध्ये देखील सलग दोनवेळा विधानसभेत प्रवेश केलेले आ. जाधव यांनी राष्ट्रवादीमधून मंत्रीपद देखील भूषविले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी संधी मिळाली असताना ते पक्षावर नाराज का असा सवाल आता अनेक कार्यकर्ते विचारू लागले आहेत. शुक्रवारी (दि.30) चिपळूण व गुहागरमधील आपल्या समर्थकांची एक बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांची मनं जाणून घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी काही प्रश्नदेखील उपस्थित केले व नाराजीचे नेमके कारण काय असा मनमोकळा प्रश्नही विचारला. मात्र, शेवटपर्यंत या बैठकीत आ. जाधव यांनी आपली पुढची दिशा काय या बाबत उपस्थितांना कल्पना दिली नाही. परंतु भाजपमध्ये प्रवेश करणार नाही हे स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेना कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही दिवस शिल्लक असतानाच ही उलथापालथ होत असल्याने अनेकांची त्याकडे डोळे लागले आहेत. आ. जाधव गुहागर की चिपळूण विधानसभा मतदारसंघातून लढणार हा प्रश्नदेखील अनुत्तरीतच राहिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादीकडे उमेदवारीच मागितलेली नाही. मात्र, गुहागरमधून विक्रांत यांनाच उमेदवारी द्यावी अशी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. दुसर्या बाजूला शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्या भेटीत आणखी कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली या बाबत स्पष्ट खुलासा झालेला नाही. समर्थकांच्या बैठकीत, गुहागर आपल्याच अधिपत्त्याखाली असेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मात्र, आपण राजकीयदृष्ट्या कोणता निर्णय घेणार हे स्पष्ट केले नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. दुसर्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर त्यांचा कल शिवसेनेकडे असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आ. जाधव गुहागर की चिपळूणमधून लढणार या बाबतही मोठी उत्सुकता आहे. शिवसेनेत आदेशच चालतो! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आ. भास्कर जाधव यांच्या भेटीनंतर कोकणातील राजकारणामध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खा. नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत तर रत्नागिरीमध्ये आ. जाधव कोणता निर्णय घेतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या संदर्भात शिवसेना कार्यकर्त्यांकडून चाचपणी केली असता स्थानिक पातळीवर कोणतीही माहिती नसल्याचे पुढे आले तर सेना कार्यकर्त्यांकडून आम्ही आदेशावर चालतो. शिवसेनेत आदेशच चालतो अशी बोलकी प्रतिक्रिया दिली.
