बेशिस्त वाहनचालकांना आजपासून लगाम

0

रत्नागिरी : अपघातांना आळा बसावा व वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी केंद्र सरकारने वाहतूक नियम भंगासाठीच्या दंडात मोठी वाढ केली आहे. 1 सप्टेंबरपासून या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू होत आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना आता चांगलाच चाप बसणार आहे. केंद्र सरकारने नवीन मोटारवाहन कायद्यातील तरतुदी लागू करण्याबाबत अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोटार वाहतूक दुरूस्ती विधेयक संमत करण्यात आले होते. दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेक वेळा वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने अपघातही घडल्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये विनाकारण अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शासनाने वाहन कायद्यामध्ये काही कडक अशा तरतूदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाहतूक नियम भंगासाठी दंडात मोठी वाढ केली आहे. पूर्वी नियम तोडला तर शे-दोनशे दंड भरून वाहनचालकांना सोडले जायचे. यामुळे किरकोळ रक्कम आहे असे वाहनचालकांना वाटते. दंड भरूनही त्यांच्यात कोणतीही सुधारणा होत नसल्याचे वाढत्या दंडात्मक कारवायांवरून दिसून येते. वाहतुकीला शिस्त लागावी, अपघातांना आळा बसावा यासाठी जुन्या कायद्यातील दुरूस्ती करणारे विधेयक गेल्या लोकसभेत मांडले होते. या विधेयकाला मंजूरी मिळाली होती. नवीन दंड आकारणीमुळे बेशिस्त वाहनचालकांना आता पाच पट दंड भरावा लागणार आहे. याची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून होणार आहे.  विशेष म्हणजे अल्पवयीन मुला-मुलींना वाहन चालविण्यास दिल्याचे आढळून आल्यास पालकांना दोषी धरले जाणार आहे. या पालकांना तीन वर्षे कारावास व 25 हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक  सुरळीत ठेवण्यासाठी अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे आता महामार्गावर अवजड वाहतूक दिसणार नाही. जर वाहतूक करताना आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here