रत्नागिरी : यंदाच्या गणेशोत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबविताना पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. यावर्षी गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलिस दलही सज्ज असल्याची माहिती त्यांनी दिली. यावर्षी जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 587 घरगुती आणि 111 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. या उत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन मंडळांना केले आहे. याचबरोबर पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच श्रींचे विसर्जन करताना सागरी जलजीवांच्या प्रजातींना धोका संभवणार नाही, तसेच पाण्याचे स्रोतही दूषित होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी स्थानिक प्रशासनांना विसर्जनस्थळावर कृत्रिम तलावांच्या सुविधा देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सुरक्षित गणपती उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांनाही आवश्यकत्या सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यातील महामार्ग आणि जिल्हा मार्गावार आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबवताना मंडळांनी शासनांच्या विविध लोकोपयोगी योजनांचा प्रसार करण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, माझी लेक भाग्यश्री, बेटी बचाव, बेटी पढाओ या उपक्रमाचा प्रसार करण्यात येणार आहे. तसेच मिरवणूक काळात लोकांनी सामाजिक एकोपा आणि सलोखा राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा पोलीस दलाकडून उत्सवाच्या काळात लागणार्या आवश्यक त्या परवानग्या ऑनलाईन देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. या कालावधीत जिल्हा महामार्गावार अवजड वाहनांना प्रतिबंधित करताना महामार्गावरील 13 तपासणी नाक्यांवर वाहनांची नियमित तपासणी आणि वॉच ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री मूर्ती प्रतिष्ठापना मुहूर्त दु. 12.30 पर्यंत : पुणे : गणेश चतुर्थीच्या प्रतिष्ठापना पूजेचा मुहूर्त सोमवार, दि. 2 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत आहे. पहिल्या प्रहरात ‘श्रीं’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी 6.30 ते 9.30 पर्यंत, तर दुसर्या प्रहरात सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 पर्यंत करावी. हे मुहूर्त सर्वोत्तम आहेत, असे शारदा ज्ञानपीठम्चे संस्थापक पं. वसंतराव गाडगीळ यांनी सांगितले. दि. 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्यापूर्वी ज्येष्ठा गौरीचे आवाहन करावे. शुक्रवारी दुर्गाष्टमी दि. 6 सप्टेंबर रोजी गौरीपूजन आणि गौरीभोजन कार्यक्रम होईल. 7 तारखेला विसर्जन होईल, असेही गाडगीळ यांनी यावेळी सांगितले.
