करुळ घाटात कंटेनर अपघातात चालक थोडक्यात बचावला

0

वैभववाडी : करुळ घाटात एका अवघड वळणावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनर संरक्षण कठड्याला जावून आदळला. संरक्षण कठड्यामुळे कंटेनर तिथेच अडकून पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या अपघातात चालक बालंबाल बचावला. हरिद्वार उत्तरप्रदेश येथून होंडा कंपनीच्या मोटारसायकल घेऊन हा कंटेनर कुडाळकडे निघाला होता. अपघात आज (ता.३१) सकाळच्या सुमारास घडला. कंटेनर चालक उदयसिंह आपल्या ताब्यातील कंटेनर हरिद्वार उत्तरप्रदेश येथून कुडाळ येथे होंडा कंपनीच्या मोटारसायकल घेऊन जात होता. करुळ घाटात एका अवघड वळणावर वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून कंटेनर थेट संरक्षण कठड्यावर आदळला. या धडकेत संरक्षण कठडा तोडून कंटेनर खोल दरीत कोसळता कोसळता थोडक्यात आश्चर्यकारकरित्या तिथेच अडकल्यामुळे चालक व कंटेनर बालंबाल बचावले. यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या अपघाताची माहिती मिळताच करुळ चेकपोस्टवर असलेले पोलिस कर्मचारी संदीप राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी इतर चालक व प्रवाशांच्या मदतीने कंटनेरच्या चालकास कॅबिनमधून सुखरुप बाहेर काढले. या अपघातामुळे घाबरलेल्या कंटेनर चालकाच्या छातीत दुखू लागल्याने पोलिसांनी त्याला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचितीच या कंटेनर चालकाला आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक दत्ताञय बाकारे व इतर पोलिस दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. अधिक तपास वैभववाडी पोलिस करीत आहेत. गणेश उत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने सध्या करुळ घाटातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु आहे. अपघातामुळे घाट मार्गातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here