नवी मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या हॉलिडे स्पेशल रेल्वेला प्रचंड गर्दी झाली आहे. पनवेल, सावंतवाडी आरक्षण करुन सुद्धा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत. पनवेल स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. रेल्वे बोगीवर कोणती बोगी आरक्षित व जनरल असा उल्लेख नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. कोकण रेल्वेकडून गणपती उत्सवासाठी मुंबई सीएसएमटी, मुंबई सेट्रल, वांद्रे, लोकमान्य टिळक टर्मिनस, अहमदाबाद, पनवेल तसेच पुणे येथून कोकणात येण्यासाठी जवळपास अडीचशे जादा गाड्या आधीच जाहीर केल्या आहेत. यातील काही गाड्या या आधीच धावू लागल्या आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यातून गणेशभक्तांचा कोकणात येण्यासाठी ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चाकरमान्यांची रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने काही विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. मात्र, असे असतानाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांचे हाल होत आहे.
