मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी; डॉ. मनमोहन सिंग

0

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाचा आर्थिक विकासदर घटल्याने नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. देशातील आर्थिक मंदीला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. मागील तिमाही जीडीपी दर 5 टक्के आहे. यावरूनच देशात मोठी आर्थिक मंदी असल्याचं दिसून येतं असं त्यांनी सांगितले आहे. नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयामुळे देशात आर्थिक मंदी आली आहे. उत्पादन क्षेत्रात 0.6 टक्के प्रगती आहे. आपली आर्थिक परिस्थिती नोटबंदी निर्णयाच्या एका चुकीमुळे डबघाईला गेली आहे. गुंतवणूकदारांमध्ये उदासिनता आणि गुंतवणुकीची घसरण झाल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत प्रगती करण्याची क्षमता असताना मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्थेत मंदी आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अशी टीका डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे. यावेळी डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, मागणी आणि पुरवठा यामधील प्रगती ही गेल्या 18 महिन्याच्या खालच्या स्तरावर गेली आहे. 15 वर्षात जीडीपीच्या दरात इतक्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. महसुलातही घट झाली आहे. छोट्या व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापारापर्यंत सगळेच जण करप्रणालीमुळे चिंतेत आहेत. मंदीचे चित्र असल्याने गुंतवणुकीतही कमालीची घट झाली आहे असं त्यांनी सांगितले. लोकांचे रोजगार जाण्याचं प्रमाण वाढत असल्याचं सांगत वाहन क्षेत्रात 3 लाख 50 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्याचसोबत असंघटित क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार जाण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे असा आरोप डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. तसेच ग्रामीण भागातील भारताची स्थिती विदारक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे योग्य दर मिळत नाही. उत्पन्नात वारंवार घट होत असल्याचं पाहायला मिळालं आहे असं मनमोहन सिंग यांनी सांगितले. दरम्यान आरबीआयकडून घेतलेले 1 लाख 76 हजार कोटी रुपये केंद्र सरकार कोणत्या योजनांसाठी वापर करणार आहे याचं उत्तर नरेंद्र मोदींकडे नाही. निर्यातीचा दर घटल्याने जागतिक बाजारात उपलब्ध झालेल्या संधीचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी फायदा करुन घेता आला नाही. सरकारची विश्वासार्हता कमी होत चालली असल्याचा दावा डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here