रत्नागिरी : नगर परिषदेच्या सत्ताधार्यांकडून विकासाच्या वल्गना अगदी पत्रकार परिषदा घेवून करण्यात येत असल्या तरी नगर परिषदेचे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील नगर परिषद शाळांची दुरवस्था आणि शाळा महाविद्यालयांकडे जाणार्या रस्त्यांची दुर्दशा पाहिली तर याचा प्रत्यय येतो. दामलेचा दर्शनी भाग धोकादायक नगर परिषद शाळा क्र. 15 म्हणजे दामले विद्यालयाच्या इमारतीचा दर्शनी भाग कधीही कोसळेल, अशा अवस्थेत आहे. या दर्शनी भागाचा स्लॅब तुटला असून आतील स्टील गंजलेल्या अवस्थेत दिसू लागले आहे. रत्नागिरी शहराच्या विकासाच्या वल्गना करणार्या नगर परिषदेच्या सत्ताधार्यांना हे दिसत नाही का? असा सवाल या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमधून विचारला जात आहे. नगर परिषदेचे शाळांकडे दुर्लक्ष नगर परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढत असताना या शाळांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. नगर परिषद शाळा क्र. 15 ही शाळा म्हणजे दामले विद्यालयाला महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची संलग्नता मिळाली आहे. यात तेथील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यात या विद्यालयाच्या उपक्रमशिल शिक्षकांमुळे पटसंख्याहि पुरेशी आहे. मात्र या शाळेच्या डागडुजीकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे. इजा होण्याची वाट पाहताहेत का? दामले विद्यालयाला सुंदर पटांगण असून त्या पटांगणाची सुंदर अशी रचना शाळेने केली आहे. मात्र शाळेच्या दर्शनी भाग कधीही पडेल, अशा अवस्थेत आहे. हा भाग शाळा सुरू असताना कोसळल्यास विद्यार्थी, शिक्षक वा पालक यांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा घटना घडेपर्यंत नगर परिषद गप्प राहणार आहे का? असा सवालही पालक विचारत आहेत. खड्ड्यांतून होताहेत हाडे खिळखिळी : दामले विद्यालयाकडे जाणार्या रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर वाहनेही अस्ताव्यस्थ पार्किंग करून ठेवलेली असतात. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता आहे. रस्ते सुधारण्याची तसदी नगर परिषदेने घेतली नसून विद्यालयात जाणार्या विद्यार्थ्यांना खड्ड्यांतून हाडे खिळखिळी करून जावे लागत आहे. याकडे नगर परिषदेच्या सत्ताधार्यांनी आणि विशेषत: प्र. नगराध्यक्षांनी लक्ष देण्याची गरज आहे. नगर परिषद शिक्षण समिती काय करते? शहरातील नगर परिषदेची सर्वोत्कृष्ट असलेली दामले शाळेचा दर्शनी भाग नगर परिषदेच्या शिक्षण समितीला दिसत नाही काय? किंवा शिक्षण समिती सभापती आणि सदस्य शाळेत जाताना डोळ्यावर पट्टी बांधून जातात की काय? असा सवाल पालक विचारत आहेत. शाळांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारत आहे. मात्र त्या शाळांच्या इमारतींचे काय? हाही एक सवाल आहे. नगराध्यक्षांनी लक्ष द्यावयास हवे : शहरात रस्ते खड्डेमय असताना त्याकडे लक्ष न देता, शहरातील उद्याने बांधण्यात सत्ताधारी धन्य मानत आहेत. तसेच शहरातील जिथे रस्त्याचे डांबरीकरण होण्याची गरज आहे, तिथे डांबरीकरण होत नाही. जिथे रस्ता सुस्थितीत आहे, तिथे डांबरीकरण करण्यात आले आहे. असे प्रताप होत असताना रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळांची दुरवस्था शहराच्या विकासावर बोलणार्या नगरसेवकांना, नगराध्यक्षांना दिसत नाही का? असा सवाल व्यक्त होत आहे. उद्याने बांधली म्हणजे शहर विकास झाला काय? शहरात सुंदर अशी उद्याने बांधण्यात आली आहेत. मात्र शाळा- महाविद्यालयांकडे जाणारे रस्ते खड्डेमय आहेत. शहर सुंदर होत आहे, हे नक्की कौतुकास्पद आहे. मात्र शाळा- महाविद्यालयांमध्ये जाणार्या रस्त्यांच्या दुर्दशेकडे कोण लक्ष देणार? हा सवाल आहे. शहरातील गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता लाला कॉम्प्लेक्स परिसरात खड्डेमय आहे. त्यात रस्त्याच्या कडेला डबर टाकण्यात आला आहे. त्या डबरवर महावितरणचे पोलही टाकण्यात आले आहेत. तर दुसरीकडे दामले विद्यालयाकडे जाणार्या रस्त्याचीही दुर्दशाच आहे. मग केवळ उद्याने बांधून शहर विकास झाला काय? असा सवाल उरत आहे.
