रत्नागिरी : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी आज श्री गणरायचं आगमन झाले. या निमित्ताने अवघा महाराष्ट्र भक्तिरसात चिंब झाला. गेले पंधरा दिवस विश्रांती घेणार्या पावसाने गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर आगमन केले. त्यामुळे गणेशाचे आगमन सुरक्षित करण्यासाठी भक्तगणांची धडपड सुरू झाली आहे. ‘गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरयाऽऽ’ अशी भक्तिमय प्रार्थना करत लाडक्या बाप्पांच्या उत्सवास आज, सोमवार, 2 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. पावसामुळे बाजारपेठेत खरेदी करतानाही गणेशभक्तांची त्रेधातिरपीट उडाली. गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 587 घरगुती आणि 111 सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. श्रावण अमावस्येपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे काही गणेश भक्तांनी एक-दोन दिवस आधीच गणरायांची मूर्ती ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत घरी आणली. जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख घरगुती गणेशाची स्थापना केली जाते. त्यामुळे सोमवारपासून सर्वत्र गणेशमय वातावरण निर्माण होणार आहे. मृदंग व टाळांच्या आवाजाने भाविक भक्तिमय वातावरणात दंग होणार आहेत. रविवारी मोठ्या प्रमाणात मुंबई, पुण्यातून चाकरमानी रत्नागिरीत दाखल झाले. त्यामुळे एसटीसह खासगी बसेसची संख्याही वाढली होती. बाजारपेठेमध्येही खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती. इकोफ्रेंडली गणेशोत्सव होण्यासाठीही ग्रामीण भागापासून शहरातील घराघरांंमध्ये प्रयत्न सुरू आहेत. कोकणातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. पोलीस यंत्रणेने महामार्गाबरोबरच एसटी, रेल्वेस्थानकातील बंदोबस्तात वाढ केली आहे. ठिकठिकाणी स्वतंत्र पथके, वायरलेस व्हॅन तैनात केल्या आहेत. घरगुती गणेशाप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवही मोठ्याप्रमाणात साजरा केला जातो. जिल्ह्यात 110 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. रत्नागिरी शहरामध्ये तब्बल 26 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, त्यात रत्नागिरीचा राजा, श्री रत्नागिरीचा राजा या मंडळांची आरास मोठी आहे. पाऊणशे वर्षांची परंपरा असणार्या टिळकआळी गणेशोत्सव मंडळांसारखी सामाजिक उपक्रम राबविणार्या मंडळांनीही आगमनाची तयारी सुरू केली आहे.
