ओरोस : सिंधुदुर्गच्या सह्याद्री पर्वत रांगा व समुद्र परिसरात, पाण्यात असलेली जैवविविधता म्हणजे आयुर्वेदाचा खजिना आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात लवकरच आयुर्वेद संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. सिंधुदुर्गनगरी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तीस खाटांचे ‘आयुष’ रुग्णालय उभारण्यात येत आहे. याचे भूमिपूजन ना. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, आरोग्य अभियानचे अधिकारी संतोष सावंत, प्राधिकरणाचे सदस्य छोटू पारकर, प्रभाकर सावंत, संदेश पारकर, जि. प. सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, अमर सावंत, आयुष अधिकारी कृपा गावडे आदींसह अधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी उपस्थित होते. श्रीपाद नाईक म्हणाले, जिल्ह्यात उपलब्ध वनसंपदेचा विचार करता येथे आयुर्वेद संशोधन केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे. तसेच ग्रामीण भागात आयुर्वेदाच्या प्रसार व्हावा यासाठी तालुका तालुक्यात आयुर्वेदिक हेल्थ सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करू आहे. आयुष रुग्णालय येत्या दोन वर्षात पूर्ण होईल. यासाठी आणखी वाढीव निधी लागल्यास उपलब्ध करून दिला जाईल. आरोग्य निरोगी राखण्यासाठी आयुर्वेदिक औषध उपयुक्त आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत देशभरात काही ठिकाणी आयुष रुग्णालय उभारण्यात आली आहेत. त्यासाठी डॉक्टरची उपलब्धता करण्यात आली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आयुषमध्ये आयुर्वेदा सोबत पंचकर्म, युनानी, योगा या सर्व गोष्टींचा समावेश होतो. सर्व सोयीनी युक्त हे आयुष रुग्णालय रुग्णांना बरे करण्याबरोबरच या ठिकाणी असणारे पंचकर्म केंद्र पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निर्सगसंपन्न पर्यटन जिल्ह्याच्या शिरपेचात या रुग्णालयाच्या माध्यमातून मानाचा तुरा खोला जाईल, जिल्ह्यातील रुग्णांना व येणार्या पर्यटकांना भारतीय उपचार पद्धतीचा लाभ घेता येईल, असे ते म्हणाले. जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी साठी 25 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. येथील तलावात बोटिंग सुविधा व सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून छोटे-छोटे रिसॉर्ट उभारण्यात येणार आहेत. खा. विनायक राऊत म्हणाले, आयुष्य रुग्णालय व्हावे यादृष्टीने आपला आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. राज्यात धुळे-नंदुरबार सह सिंधुदुर्ग अशा चार रुग्णालयांना आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे. यातील भूमिपूजनाचा पहिला उपक्रम सिंधुदुर्गात होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही आयुष रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी आपली असल्याचे ते म्हणाले. आ. वैभव नाईक म्हणाले, सावंतवाडीतील मल्टी स्पेशलिटी रुग्णालय, कुडाळातील महिला रुग्णालय व आता आयुष रुग्णालय अशा आरोग्य सुविधा सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य सेवेत परिपूर्ण होईल. त्याचबरोबर येथील डॉक्टरांची कमतरता ही कमी होईल. आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे यांनी मानले.
