चिपळूण : निविदा प्रक्रियेतील त्रुटी व अडथळ्यांमुळे वादात सापडलेल्या अश्वारूढ शिवछत्रपती पुतळ्याच्या उभारणीचे भूमिपूजन गुरुवारी (दि.4) पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते होणार आहे. अनंत गार्डन येथे अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारावा अशी दहा वर्षांपूर्वी शिवसेनेकडून व तत्कालीन न.प. सभागृहाकडून मागणी होऊन निर्णय झाला. त्यानुसार ही प्रक्रिया कासवगतीने सुरू राहिली. काहीवेळा शिवसैनिक आक्रमक झाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय असल्याने त्यांच्या पुतळ्याबाबत राजकारण होऊ नये, अशी भावना जनतेतून निर्माण झाली. अखेर सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून वर्षभरापूर्वी नियोजित जागेत पुतळा उभारण्याचे काम निश्चित झाले. न.प.ने आपल्या फंडातून तसेच विद्यमान नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी देखील सुमारे एक कोटी रूपये परिसर सुशोभिकरणाला मंजूर केले. त्याचप्रमाणे या विषयात पालकमंत्री वायकर यांनी प्राधान्याने लक्ष देऊन अश्वारूढ शिवरायांचा पुतळा स्वखर्चाने देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांनी अष्टधातूचा पुतळा उभारण्यासाठी तयार ठेवला आहे. पुतळा उभारणीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ ना. वायकर यांच्या हस्ते दि. 29 ऑगस्ट रोजी नियोजित करण्यात आला होता. मात्र, दरम्यानच्या काळात कोट्यवधी रूपये खर्चाच्या कामाची निविदा अल्प कालावधीसाठी प्रसिद्ध केली गेली. त्यामुळे गुरुवारी आयोजित केलेला भूमिपूजन समारंभ पालकमंत्री वायकर यांनी स्थगित ठेवत प्रस्तावित जागेत शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कामाचा औपचारिक शुभारंभ केला. ही तांत्रिक बाब न.प.च्या निदर्शनास आल्यावर निविदेतील तांत्रिक त्रुटी व अडथळे दूर करण्यात आले. त्यामुळे या कामाच्या भूमिपूजन समारंभाला 4 सप्टेंबरचा मुहूर्त मिळाला आहे. त्याबाबतचे पत्र नगराध्यक्षा खेराडे यांनी ना. वायकर यांना दिले आहे.
