बंगळूर : ‘चांद्रयान-२’चा चंद्राच्या दिशेने यशस्वीरित्या प्रवास सुरू आहे. या यानातील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर आज, सोमवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे ते १ वाजून ४५ मिनिटे या कालावधीत वेगळे होणार आहेत. त्यानंतर विक्रम लँडरचा चांद्रभूमीवर उतरवण्याचा घटनाक्रम सुरू होईल. काल, रविवारी ‘चांद्रयान-२’ यानाचे इंजिन ५२ सेकंदासाठी प्रज्वलित करून यानाला अखेरच्या कक्षेतून चंद्राभोवतीच्या ११९ किलोमीटर बाय १२७ किलोमीटरच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) यश आले. या यानाने ३० ऑगस्टला चौथ्या आणि १ सप्टेंबरला पाचव्या कक्षेत प्रवेश केला होता. आज २ सप्टेंबरला या यानातील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर वेगळे होतील. विक्रम लँडर ७ सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचेल. त्यावेळी हे लँडर प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरेल व भारताचा समावेश चंद्रावर उतरलेल्या अमेरिका, रशिया आणि चीन या बड्या देशांच्या पंक्तीत होईल. ‘चांद्रयान-२’ने २० ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. या कक्षेत पूर्णपणे स्थापित होण्यासाठी त्याला सुमारे अर्ध्या तासाचा वेळ लागला. २३ दिवस पृथ्वीभोवती भ्रमण केल्यानंतर चंद्राच्या कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी यानाला सहा दिवस लागले होते. यानाने २६ ऑगस्टला दुसर्यांदा चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे पाठवली होती. ही छायाचित्रे चंद्राच्या पृष्ठभागापासून ४३७५ किलोमीटर अंतरावरून घेतली होती.
