नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गोळा फेक पटू तेजिंदर पाल तूर याने चेक प्रजासत्ताक येथे सुरू असलेल्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. अर्जुन पुरस्कार विजेता तेजिंदरने 20.9 मीटर गोळाफेक केली. तेजिंदरने यापूर्वी 19.09, 19.15, 19.87, आणि 19.75 मीटर इतकी गोळाफेक केली होती. या स्पर्धेत शिवपालसिंग याने भाला फेकीत सुवर्णपदक पटकावले. जवळपास एक महिन्यानंतर मैदानावर पुनरागमन करणार्या शिवपालने 81.36 मीटर भाला फेकला. आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता शिवपाल यापूर्वीच विश्व चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला आहे. शिवपालसह बिपीन कसाना यानेही 80.13 मीटर भालाफेक केली. त्याला कांस्यपदक मिळाले. महिला गटात अनु राणीही रौप्यपदकाची मानकरी ठरली आहे.
