वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालयाचे अनन्यसाधारण महत्व : उदय सामंत

0

◼️ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई : भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य मध्यवर्ती ग्रंथालय येथे आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले.

श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून राज्यातील सर्व ग्रंथालये सुरू होत आहेत. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालयाचे अनन्यसाधारण महत्व आहे. ‘वाचन प्रेरणा दिन’ केवळ आज साजरा न करता तो ३६५ दिवस साजरा करण्यात यावा. विशेषतः वाचनाची चळवळ गावागावात जाण्यासाठी हा दिवस गाव पातळीवर साजरा होणे आवश्यक आहे.

ग्रंथालय चळवळ रूजावी यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून आज साजरा केला जातोय. याच दिनी शासनाने ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सर्व स्तरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. डॉ.कलाम यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. या अनमोल साहित्याचे वाचन सर्वांनी करीत त्यांचे विचार आचरणात आणावेत असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

श्री. सामंत म्हणाले, बदलत्या काळानुरूप वाचन संस्कृती वाढण्यासाठी आवश्यक त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. ग्रंथालये आधुनिक होण्यासाठी शासनाने वेळोवेळी पाऊले उचलली असून शासन यासाठी सर्व सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. ‘वाचन प्रेरणा दिन’ हा महाविद्यालयीन स्तरावरही मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे.

यावेळी, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, लेखक विश्वास पाटील, ग्रंथालय संचालनालय संचालिका श्रीमती शालिनी इंगोले व संबंधित उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:27 PM 15-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here