मुंबई-गोवा महामार्गावर बर्निंग बसचा थरार

0

मुंबई : महामार्गाच्या दुरवस्थेने त्रस्त असणार्‍या चाकरमान्यांना रविवारी सकाळी 7 वा. माणगाव- लोणेरेनजीक वडवली गावाजवळ कोकणात जाणार्‍या मुंबई – चिपळूण-दहिवड या एसटीने अचानक पेट घेतल्याने एसटीचा बर्निंग थरार अनुभवण्यास मिळाला. एसटीच्या चालकाने प्रसंगावधान राखून एसटी मुंबई-गोवा महामार्गावर उभी केली. यामुळे एसटीत असणारे सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अग्‍निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत एसटी जळून खाक झाली. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणारी वाहतूक टोल फाटा नांदवीमार्गे गोरेगाव अशी वळविण्यात आली, असे वाहतूक यंत्रणेने सांगितले. मुंबई येथून चिपळूण-दहिवडे येथे जाण्यासाठी एमएच 20 बीएल 4209 ही रातराणी एसटी निघाली होती. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे पळस्पे ते इंदापूरपर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत पोहोचली. मुंबई-गोवा महामार्गावर असणार्‍या माणगाव – लोणेरेनजीक वडपाले गावाजवळ एसटी आली असता इंजिनमधून अचानक धूर येऊ लागल्याने चालक दिनेशकुमार जगदणेे यांनी महामार्गानजीकच एसटी थांबविली. चालकाच्या लक्षात आले, एसटीच्या इंजिनमध्येच शॉर्टसर्किट झाले आहे. यामुळे एसटीचालक जगदणे आणि वाहक संतोष माळी यांनी एसटीत असणार्‍या सुमारे 60 प्रवाशांना त्यांचे साहित्य घेऊन खाली उतरण्यास सांगितले. सर्व प्रवासी तातडीने आपले साहित्य घेऊन एसटीतून खाली उतरले आणि बघता बघता या एसटीने महामार्गावर पेट घेतला. चालक जगदणे आणि वाहक माळी यांनी प्रसंगावधान राखून प्रवाशांना खाली उतरल्याने जीवितहानी झाली नाही. एसटीला आग लागल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली. त्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणारी आणि कोकणातून मुंबईकडे येणारी वाहतूक टोल फाटा नांदवीमार्गे गोरेगाव अशी वळविण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here