रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 33 हजार 431 शेतकर्यांनी शेतकर्यांनी 35 कोटी 7 लाख 49 हजार रुपयांचा प्रीमियम भरला होता. या शेतकर्यांना 22 कोटी 38 लाख 52 हजार रुपयांचा परतावा जाहीर करण्यात आला आहे. विमा कंपन्यांनी रक्कम बँकांकडे वर्ग केली असून, बँकांकडून थेट शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फळपीक विम्यासाठी न्यू इंडिया इन्शूरन्स विमा कंपनीची शासनाने नियुक्ती केली होती. स्वयंचलित हवामान केंद्राच्या अहवालानुसार शेतकरी लाभार्थी निश्चित करण्यात आले आहे. विमा कंपनीने खातेदारांची बँकनिहाय यादी जाहीर केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 17 हजार 187 काजू बागायतदारांना 12 कोटी 84 लाख 78 हजार रूपयांचा परतावा मिळाला आहे. यामध्ये 286 बिगर कर्जदार शेतकर्यांचा समावेश आहे. तसेच 15 हजार 708 आंबा बागायतदारांना 9 कोटी 53 लाख 74 हजार रूपयांचा परतावा जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये 250 बिगर कर्जदार शेतकर्यांचाही समावेश आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा, काजू पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. असे असतानाही स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे देण्यात येणार्या चुकीच्या निकषामुळे शेतकर्यांचा तोटा झाला आहे. हवामानातील बदलामुळे पिकावर परिणाम होवूनसुद्धा हवामान केंद्राच्या अहवालानुसार चुकीचे निकष नोंदविले गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकरी विमा परताव्यापासून वंचित राहिले आहेत. यावर्षी फळपीक विमा परताव्याची रक्कम वेळेवर जाहीर करण्यात आली असून, शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम देखील वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
