बाप्पांचे जल्‍लोषी स्वागत

0

कणकवली : नैसर्गिक वनस्पतींनी सजलेली मंडपी, सुंदर, सुबक  सजावट, विद्युत रोषणाई, पताके, आरत्या, फटाक्यांची आतषबाजी, उकडीच्या 21 मोदकांचा खास कोकणी नैवेद्य अशा मंगलमय, भक्‍तिमय वातावरणात विधीवत पूजनाने सिंधुदुर्गातील घराघरांत श्री गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता अशा श्री गणेशाची सिंधुदुर्गात 68 हजार 311 घरगुती, तर 34 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आली. सिंधुदुर्गात अनेक घरांमध्ये गणेशभक्‍तांनी श्रीगणरायांची मूर्ती एक दिवस अगोदर रविवारी आणल्या होत्या. रविवारी रात्री उशिरापर्यंत जागून सजावट, विद्युत रोषणाई आटोपण्यात आली होती. सोमवारी पहाटेपासून घराघरांत गणेश चतुर्थीची लगबग सुरू होती. घराघरांमध्ये साऊंड सिस्टीमवरून आरत्या, भजनांचे सूर घुमत होते. फुले, दुर्वा आणि मंडपीची सजावट यात पुरुष मंडळी व्यस्त होती. गणेश पूजनाच्या तयारीबरोबरच घराघरांत श्री गणेशासाठी विशेष असलेल्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्याची धावपळ सुरू होती. दुपारपर्यंत घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पूजा, नैवेद्य, आरती केल्यानंतर  पुढे पाच, सात, नऊ, अकरा आणि अगदी एकवीस ते 42 दिवस चालणार्‍या या उत्सवाचा शुभारंभ झाला. सिंधुदुर्गात गणेशोत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू देत, यासाठी सिंधुदुर्गचे पोलिस अहोरात्र कार्यरत आहेत. चाकरमान्यांच्या आगमनाबरोबरच महामार्ग तसेच अंतर्गत रस्ते वाहतूक सुरळीत सुरू राहावी, यासाठी जिल्हा पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी जादा पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मुंबईतून पुणे-कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गात येणार्‍या भाविकांची संख्या यावर्षीही मोठी होती. रविवारी रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले. गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती. जिल्ह्यात खारेपाटण ते बांदा-इन्सुलीसह प्रत्येक नाक्यावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. प्रत्येक संशयित वाहनाची तपासणी करण्यात येत होती. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणीही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस तसेच होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच समुद्र किनारी सुरक्षिततेच्या दृष्टिने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजासह कणकवलीत रिक्षा संघटना, पोलिस स्टेशन, एसटी बसस्थानक, संतांचा गणपती तसेच सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळांचे कार्यकर्ते गेले काही दिवस डेकोरेशन, मंडप व्यवस्थेसाठी झटत होते. आज मंडपांमध्ये श्री गणराज विराजमान झाल्याने या कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेने गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. काही घरगुती गणेशांचे दीड दिवसांनी मंगळवारी विसर्जन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here